

बँकॉक : थायलंडच्या घनदाट जंगलात दुर्मीळ कोळ्याचा शोध लागला आहे. त्याच्या शरीराचा एक भाग नराचा तर दुसरा भाग मादीचा आहे. आपल्या या अनोख्या जैविक रचनेमुळे हा कोळी सध्या जगभर चर्चेचा विषय बनला आहे. लेडीबॉय स्पायडर असे त्याचे नाव आहे. त्याचे डावे अंग नारंगी रंगाचे आहे, जे मादीचे गुण दर्शवते, तर उजवा भाग पांढर्या रंगाचा आहे जो नराचे गुण दर्शवतो.
शरीराच्या अवयवांमध्ये आणि रंगांमध्ये स्पष्ट विभाजन ही या कोळ्याची मोठी खासियत आहे. या आश्चर्यकारक कोळ्याचा शोध थायलंडमधील कंचनाबुरी प्रांतातील एका जंगलात रस्त्याच्या कडेला लागला. चुलालोंगकॉर्न युनिव्हर्सिटीचे संशोधक कोळ्यांचे बिळ शोधत असताना त्यांची नजर या अनोख्या जीवावर पडली. हा कोळी विशबोन स्पायडर प्रजातीचा आहे. जो जमिनीमध्ये बिळ करून राहतो आणि दबा धरून शिकार करतो. वैज्ञानिकांना असाही संशय आहे की, हा कोळी विषारी असू शकतो कारण त्याने प्रयोगशाळेत अभ्यासादरम्यानही आपल्या टोकदार दातांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.