European Wildfires | युरोपातील आगीत बॉम्‍बचा धोका! वणव्यांमुळे दुसऱ्या महायुद्धातील न फुटलेल्या स्फोटकांची गंभीरता वाढली

European Wildfires |
European Wildfires | युरोपातील आगीत बॉम्‍बचा धोका! वणव्यांमुळे दुसऱ्या महायुद्धातील न फुटलेल्या स्फोटकांची गंभीरता वाढली
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्‍था : युरोपात वाढत्या वणव्यांमुळे केवळ जंगल आणि मानवी वस्तीच धोक्यात आली नसून, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जमिनीत गाडलेली आणि अद्याप न फुटलेली बॉम्बस्फोटके व युद्धसामग्रीही मोठा धोका ठरत आहे. जर्मनी आणि फ्रान्समधील अलीकडील वणव्यांदरम्यान अशा जुन्या स्फोटकांचा धोका समोर आला.

जर्मनीच्या ईशान्य भागातील म्युरिटझ नॅशनल पार्कमध्ये जुलैमध्ये वणवा भडकला; मात्र येथील जमिनीत शीतयुद्धाच्या काळातील युद्धसामग्री असल्याने अग्निशमन दलासोबत बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकांनाही तैनात करण्यात आले. काही भागांत स्फोट होण्याची भीती असल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांना थेट आगीच्या ठिकाणी जाणे शक्य झाले नाही.

फ्रान्समध्ये ७५ हून अधिक बॉम्ब

दक्षिण-पश्चिम फ्रान्समधील गिरोंद परिसरात तब्बल ४२ हजार हेक्टर क्षेत्र वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडले. ले पोर्ज गावाजवळील शेतांमधून आग पसरत असताना दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जुन्या तोफगोळ्यांचा साठा जमिनीबाहेर आला. आगीत जळून गेलेल्या जमिनीतून किमान ७५ जुने तोफगोळे बाहेर काढण्यात आले. त्यापैकी काही स्फोटकांनी वणव्याच्या उष्णतेमुळे स्फोट केला. एका स्फोटकाने तर जवळील घराची भिंत भेदली.

हवामान बदलामुळे जुनी समस्या पुन्हा ऐरणीवर

युरोपातील वाढते तापमान, दीर्घकाळ टिकणारा दुष्काळ आणि तीव्र उष्णतेमुळे वणव्यांचे प्रमाण आणि तीव्रता वाढत आहे. त्यामुळे दशकांपूर्वीच्या युद्धांमध्ये जमिनीत पुरलेली किंवा हरवलेली स्फोटके पुन्हा धोकादायक ठरण्याची शक्यता वाढली आहे. वणव्यांशी लढताना अग्निशमन दलाला अशा स्फोटकांचा विचार करून बचावकार्य करावे लागत असल्याने अनेक ठिकाणी आग नियंत्रणात आणण्याचे काम अधिक कठीण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news