

पुढारी ऑनलाईन :
युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी रशियाला युक्रेनी नागरिकांवरील हवाई हल्ले ३० दिवसांसाठी थांबवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी रशियावर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला आहे. झेलेन्स्की यांनी एक्सवरील पोस्टद्वारे रशियाला हा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी यापूर्वी रशियाकडून २००० वेळा युद्धबंदी उल्लंघन झाल्याची तक्रार केली होती. यानंतर, हवाई हल्ला थांबवण्याचा प्रस्तावही मांडला आहे.
झेलेन्स्की यांनी रविवारी नागरी पायाभूत सुविधांवर लांब पल्ल्याच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांवर 30 दिवसांचा विराम देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांनी सांगितले की, ईस्टर युद्धबंदी दरम्यान रशियन सैन्याने २००० हून अधिक वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले, परंतु या काळात कोणतेही हवाई हल्ले झाले नाहीत. ते म्हणाले की, रशियाने जमिनीवरून हल्ले सुरू ठेवले असले तरी हवाई हल्ले झालेले नाहीत.
झेलेन्स्की यांनी एक्सवर लिहिले की, ईस्टरच्या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत कमांडर-इन-चीफ सिर्स्की चा अहवाल. या वेळेपर्यंत दिवसाच्या सुरूवातीपासून रशियन सैन्याने पुतिन यांच्या युद्ध विरामाचे दोन हजार वेळा उल्लंघन केले. विविध दिशांनी आमच्या स्थळांवर हल्ले करण्यात आले. ज्यात सर्वात जास्त हल्ले हे पोक्रोवस्क दिशेत झाले आहेत. रशियाकडून गोळीबाराच्या एकूण १,३५५ घटना घडल्या, त्यापैकी ७१३ घटनांमध्ये जड शस्त्रांचा वापर करण्यात आला.
सर्व प्रमुख आघाडीच्या दिशानिर्देशांमध्ये, रशियाने युद्धबंदीचे आश्वासन पूर्ण केलेले नाही आणि रशियाला संपूर्ण युद्धबंदीच्या आमच्या युक्रेनियन प्रस्तावाला प्रतिसाद देण्यासाठी जवळजवळ एक संपूर्ण दिवस पुरेसा नव्हता - जो आतापासून, ईस्टरपासून सुरू होऊन, ३० दिवस चालेल.
मात्र, आज कोणत्याही हवाई हल्ल्याची चितावणी देण्यात आली नाही. युद्धबंदीचे हे स्वरूप साध्य झाले आहे आणि ते पुढे नेणे सर्वात सोपे आहे. युक्रेनने नागरी पायाभूत सुविधांवर लांब पल्ल्याच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून होणारे कोणतेही हल्ले किमान ३० दिवसांसाठी थांबवण्याचा प्रस्ताव दिला आहे, जो आणखी वाढवता येऊ शकतो. जर रशिया अशा पावलाला सहमत नसेल, तर तो केवळ मानवी जीवन नष्ट करणाऱ्या आणि युद्ध लांबवणाऱ्या गोष्टी करत राहण्याचा प्रयत्न करत राहण्याचा पुरावा असेल."
या आधी दोन्ही देशांनी एकमेकांवर युद्धबंदीचे उल्लंघटन केल्याचा आरोप केला होता. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने यूक्रेनी सैनिकांनी ४४४ वेळा बंदूक आणि मोर्टाराच्या साहाय्याने रशियन ठिकाणांवर हल्ला केल्याचा आरोप केला. तर यावर झेलेन्स्की यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ईस्टरनिमित्त ३० तासांच्या युद्धबंदीची घोषणा करूनही, रशियन सैन्याने ईस्टरच्या दिवशी आपले हल्ले वाढवल्याचा आरोप केला. २०२२ ला युद्ध सुरू झाल्यानंतर ही दुसरी वेळ होती, जेंव्हा दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा झाली होती. याआधी जानेवारी २०२३ मध्ये ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या दरम्यान युद्ध बंदीचा प्रयत्न निष्फळ ठरला होता. कारण यावेळी दोन्ही देश या प्रस्तावावर सहमत झाले नाहीत.