कीव्ह, वृत्तसंस्था : युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या कुर्स्क या प्रांतातील आणखी एक महत्त्वाचा पूल हल्ला करून उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडीओ युक्रेनच्या हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेशचूक यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पुलाचे धोरणात्मक महत्त्व आहे. तो बंद झाल्यानंतर रशियाच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होणार असल्याचे ओलेशचूक यांनी सांगितले.
युक्रेनी सैन्याने उद्ध्वस्त केलेला हा रशियातील दुसरा पूल आहे. दोन दिवसांपूर्वी युक्रेनच्या लष्कराने कुर्स्कमधील ग्लुश्कोवो येथील एक पूल पाडला होता. हा पूल सीम नदीवर बांधला होता. हा पूल युक्रेनियन सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. रशियातील झ्वानोये गावात सीम नदीवरील दुसर्या पुलावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कुर्स्क प्रांतात तीन पुलापैकी आता एकच पूल शिल्लक राहिला आहे. दुसरीकडे युक्रेननेही बेलारूसच्या सीमेवर हजारो सैनिक तैनात केले आहेत. युक्रेनने जुलैच्या सुरुवातीला बेलारूसच्या सीमेवर एक लाख 20 हजार सैनिक तैनात केले होते. त्यात त्यांनी आणखी भर पडली असल्याचा दावा बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी एका मुलाखतीत केला आहे. कुर्स्क प्रांताला बफर झोन करण्यासाठी हल्ला करत आहोत, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले. युक्रेनी लष्कराने 6 ऑगस्ट रोजी रशियाच्या कुर्स्क प्रांतावर हल्ला केला होता. त्यानंतर रशियाने कुर्स्कमध्ये आणीबाणी लागू केली. तसेच रशियाने बेलगोरोडमध्येही आणीबाणी लागू केली आहे.
युक्रेनच्या सैन्याने रशियन शहर सुदजा ताब्यात घेतले आणि येथे लष्करी कमांड केंद्र उघडले आहे. सुदजा हे युक्रेन सीमेपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तेथे रशियन गॅस पाईपलाईन स्टेशन आहे. तेथून रशिया युरोपीय देशांना गॅस पुरवठा करतो. युक्रेनच्या सैन्याने रशियामध्ये 35 कि.मी. घुसून सुमारे 82 गावे ताब्यात घेतली असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.