पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया विरुद्ध युक्रेन या युद्धात युक्रेन आता रशियावरच वरचढ ठरू लागलेला आहे. नव्याने केलेल्या हल्ल्यात युक्रेनने ड्रॅगन ड्रोनचा (Dragon Drone) वापर केल्याचे पुढे आले आहे. हे ड्रोन 'आग ओकत' उड्डाण करतात. ही आग म्हणजे प्रत्यक्षात २००० सेल्सिअस इतक्या तापमानाचे वितळलेले धातू आहेत. त्यामुळे द्रव रूपातील हे तप्त धातू ज्या कशावर पडतात ते त्याच क्षणी भस्मसात होतात. युक्रेनच्या या ड्रॅगन ड्रोनमुळे रशियाच्या फौजांच्या मनात भीतीची वातावरण निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
युक्रेनच्या संरक्षक विभागाने बुधवारी हे व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे ड्रोन जमिनीपासून अगदी कमी उंचीवर उड्डाण घेतात. रशियाचे सैनिक लपून बसलेल्या जंगल भागावर युक्रेनने या ड्रोनमधून वितळलेले तप्त धातू ओतले.
अॅल्युमिनिअमची गरम पावडर आणि आयरन ऑक्साइड यांचे मिश्रण २००० डिग्री सेल्सिअसला वितळते. याला थर्माईट असे नाव आहे. ज्या झाडीत रशियन सैन लपले आहे, त्यांना आग लावण्यासाठी युक्रेन याचा वापर करत आहे. या ड्रोनमधून जेव्हा हा द्रव धातू ओतला जातो, तेव्हा आग फेकली जात असल्यासारखे दिसते. त्यामुळे याला ड्रॅगन ड्रोन म्हटले जाते.
युक्रेनच्या 60th Mechanised Brigade ने या ड्रोनचे कौतुक केले आहे. हा आमच्या शत्रूला खरा धोका असून, अचूक निशाण्यावर ड्रोन हल्ला करू शकते, असे म्हटले आहे.
थर्माईट ज्या कशावर पडते ते जळून नष्ट होते, त्यामुळे यातून बचाव करणे फार कठीण जाते. याचा शोध १८९०मध्ये जर्मनीत लागला आणि याचा वापर वेल्डिंगमध्ये केला जात असे. पहिल्या महायुद्धात जर्मनीने याचा शस्त्र म्हणून वापर केला. तर दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि मित्र राष्ट्र अशा दोन्ही बाजूंनी याचा वापर केला होता. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार थर्माईटचा वापर नागरिकांविरुद्ध करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. (Dragon Drone)