पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढ आणि अमेरिका फर्स्ट धोरणाचे पडसाद जगभरातील अर्थव्यवस्थेवर पडताना दिसत आहेत. आता या धोरणानंतर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर ( UK PM Keir Starmer) जागतिकीकरणाच्या युगाच्या समाप्तीची घोषणा करणार आहेत, असे वृत्त 'टाइम्स'ने दिले आहे.
एका वरिष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्याचा हवाला देत 'टाइम्स'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, "स्टार्मर प्रशासन ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाशी सहमत नाही; पण आता मान्य करूया की, एक नवीन युग सुरू झाले आहे. बरेच लोक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दृष्टिकोनाचे समर्थन करतात. यासंदर्भात सोमवारी ते अधिकृत घोषणा करणार आहेत."
स्टार्मर यांनी म्हटलं आहे की, 'जागतिकीकरण अनेक काम करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त नाही. व्यापार युद्ध हा एकमेव उपाय आहे, असे आम्हाला वाटत नाही. हा एक वेगळा मार्ग आहे हे दाखवण्याची संधी आहे. ट्रम्प व्यापारातील अडथळे दूर करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. यामुळे स्पर्धा वाढेल आणि देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावे लागतील. 'एचएसबीसी' बँकेचे प्रमुख सर मार्क टकर यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. मागील महिन्यात हाँगकाँगमध्ये झालेल्या एचएसबीसीच्या जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेला संबोधित करताना, टकर यांनी भाकीत केले होते की, वाढत्या जागतिक तणाव आणि ट्रम्पच्या आक्रमक व्यापार धोरणांमुळे जग लहान प्रादेशिक गटांमध्ये विभागले जाण्याची शक्यता आहे. अशा गटांमुळे मजबूत व्यापार संबंध निर्माण होऊ शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी अमेरिकन आयातीवर जास्त शुल्क लादणाऱ्या देशांवर परस्पर शुल्क आणि १० टक्के बेसलाइन शुल्काची घोषणा केली होती. '२ एप्रिल २०२५ हा दिवस नेहमीच अमेरिकन उद्योगाचा पुनर्जन्म म्हणून आठवणीत ठेवला जाईल. अमेरिकेला पुन्हा समृद्ध बनवण्यास सुरुवात केली म्हणून लक्षात ठेवला जाईल.'