Social Media Ban : १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी, सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ९० टक्के पालकांचा बंदीला पाठिंबा

ब्रिटन पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा मोठा निर्णय
Social Media Ban : १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी, सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ९० टक्के पालकांचा बंदीला पाठिंबा
Published on
Updated on

लंडन : मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी ब्रिटन सरकारने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सोमवारी जाहीर केले की, देशात १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया साईटस्‌वर पूर्णपणे बंदी घातली जाईल. याशिवाय गेमिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरही कडक निर्बंध लादले जातील.

लहान मुलांना ‘ऑनलाईन’ धोक्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न

एका पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान स्टार्मर म्हणाले, मुलांना ऑनलाईन सुरक्षित ठेवणे आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या मक्तेदारीला लगाम घालणे आवश्यक आहे. हा निर्णय ब्रिटनच्या मूल्यांना दर्शवतो. १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर पूर्ण बंदी घालणे हाच योग्य पर्याय आहे. या निर्णयामुळे टिकटॉक, स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामसारख्या लोकप्रिय साईटस्‌वर बंदी येईल. तसेच अनोळखी व्यक्तींशी संवाद साधण्याची परवानगी देणाऱ्या गेमिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंग सेवांवरही कारवाई केली जाईल. ऑफलाईन जगात आपण आपल्या मुलाला अनोळखी व्यक्तीसोबत सोडतो का, मग ऑनलाईन जगात असे का होऊ द्यायचे, असा सवाल त्यांनी केला.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला बंदी लागू

सरकारकडे या बंदीचे पहिले पाऊल उचलण्याचे अधिकार असून वर्षाच्या अखेरीस याचे नियम तयार केले जातील आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला (स्प्रिंग २०२१) ही बंदी पूर्णपणे लागू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली होती. ऑस्ट्रेलियानंतर असा निर्णय घेणारा ब्रिटन हा दुसरा मोठा देश ठरणार आहे.

९० टक्के पालकांचा बंदीला पाठिंबा

या निर्णयापूर्वी ब्रिटन सरकारने पालक, शिक्षक आणि तरुणांशी विस्तृत चर्चा केली. यात १ लाख १६ हजारहून अधिक प्रतिक्रिया मिळाल्या. धक्कादायक बाब म्हणजे, ८३ टक्के पालकांनी मानले की, सोशल मीडियाचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत, तर ९० टक्के पालकांनी मुलांसाठी १६ वर्षे ही किमान वयोमर्यादा असण्याच्या बाजूने कौल दिला. दरम्यान, काही मानसशास्त्रज्ञांनी या बंदीच्या प्रभावितेवर शंका उपस्थित केली आहे.

१) गेमिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर निर्बंध : अनोळखी व्यक्तींशी संवाद साधण्याची परवानगी देणाऱ्या गेमिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरही कडक कारवाई केली जाईल.

२) पुढील वर्षापासून अंमलबजावणी : या वर्षाच्या अखेरीस नियम तयार करून पुढील वर्षाच्या सुरुवातीला (स्प्रिंग) ही बंदी पूर्णपणे लागू केली जाण्याची शक्यता आहे.

३) ९० टक्के पालकांचा मोठा पाठिंबा : सरकारी सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ९० टक्के पालकांनी मुलांसाठी सोशल मीडिया वापराची वयोमर्यादा किमान १६ वर्षे ठेवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news