

PSG vs Inter Milan : फ्रान्समधील पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) क्लबने UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले. शनिवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या सामन्यात फ्रान्समधील 'पीएसजी'ने इटालियन क्लब इंटर मिलानचा 5-0 असा पराभव केला. 'पीएसजी'ने प्रथमच चॅम्पियन्स लीगवर आपल्या नावाची मोहर उमटवली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या विजयाचा जल्लोष करत प्रेक्षक पॅरिसमध्ये आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले. मात्र जल्लोषाचे रुपांतर दंगलीत झाले. जमावाने पोलिसांवर हल्ला करत वाहनांची जाळपोळ केली. या हिंसाचाराचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत.
'डेली मेल'च्या वृत्तानुसार, सामन्यानंतर चाहते रस्त्यावर उतरले. काहींनी फटाके फोडले. अचानक जमाव हिंसक झाला. काहींनी वाहनांना आग लावली. पॅरिस पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. वाहनांची जाळपोळ करत चाहत्यांनी मास्क घालूनही फटाके फोडले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या हिंसाचारात तीन फुटबॉल प्रेक्षक जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
सोशल मीडियावर धक्कादायक फुटेज समोर आले आहे. यामध्ये पॅरीसमध्ये पार्क डेस प्रिन्सेसजवळ हजारो चाहते युसीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी जमलेल्या ठिकाणाजवळ हिंसाचार उसळल्याचे दिसत आहे. स्टेडियमजवळ अनेक ठिकाणी आगी लावल्या. फ्रान्सचे गृहमंत्री ब्रुनो रिटेल्यू यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं की, जल्लोषाच्या नावाखाली गैरवर्तन करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे वर्तन असह्य आहे." दरम्यान, फ्रान्सच्या राजधानीत पीएसजीच्या चाहत्यांनी गोंधळ घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. या महिन्याच्या सुरुवातीला, पॅरिसमध्ये पीएसजीच्या आर्सेनलवर विजयानंतर, चाहत्यांनी कार पेटवली होती. यावेळी झालेल्या हिंसाचारात अनेक लोक जखमीही झाले होते.
UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपदासाठी जर्मनीतील म्युनिक येथील अलायन्झ अरेना येथे अंतिम सामना झाला. अशरफ हकीमीच्या गोलने 'पीएसजी' संघाने 12 व्या मिनिटाला आघाडी घेतली. त्यानंतर 20 व्या मिनिटाला डिअरी डुई याने 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. हाफ टाईमपर्यंत पीएसजी २-० ने आघाडीवर होती. ६३ व्या मिनिटाला देइरीने सामन्यातील दुसरा आणि पीएसजीचा तिसरा गोल करत संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. ७३ व्या मिनिटाला ख्विचा क्वाराखेलियाने आणि ८६ व्या मिनिटाला सेनी मायुलुने गोल करून त्यांच्या संघाला ५-० अशी आघाडी घेतली. इंटर मिलानला पुनरागमन करणे अशक्य झाले. अशाप्रकारे, पीएसजीने पहिले चॅम्पियन्स लीग जेतेपद जिंकले. सर्वाधिक वेळा चॅम्पियन्स लीग विजेतेपद जिंकण्याचा विक्रम रिअल माद्रिदच्या नावावर आहे. त्यांनी १५ वेळा विजेतेपद जिंकले आहे. एसी मिलान सात विजेतेपदांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि बायर्न म्युनिक आणि लिव्हरपूल प्रत्येकी सहा विजेतेपदांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.