

पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी रमजानपूर्वी मोठ्या प्रमाणात कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींनी १,२९५ कैद्यांना माफी दिली, तर पंतप्रधानांनी १,५१८ कैद्यांना क्षमादान जाहीर केले. यामध्ये ५०० हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश आहे. हा निर्णय म्हणजे UAE आणि भारतातील दृढ संबंधांचे प्रतिक मानले जात आहे.
या निर्णयामुळे कैद्यांना आपल्या कुटुंबीयांसोबत राहून पुन्हा नव्या जीवनाची सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. UAE प्रशासन वर्षानुवर्षे रमजान आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी मानवी दृष्टीकोनातून अशा माफीनामा कार्यक्रमाची अंमलबजावणी करते. या निर्णयामुळे केवळ न्यायदानच नव्हे, तर जागतिक स्तरावर UAE च्या सहिष्णुता व सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेचेही दर्शन घडते.
UAE मध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक काम करत असून, त्यांच्या योगदानाचा प्रशासन नेहमीच सन्मान करते. या पार्श्वभूमीवर, भारतीय दूतावासानेही UAE प्रशासनाचे आभार मानले आहेत. या क्षमादानामुळे अनेक भारतीय कुटुंबांना दिलासा मिळाला असून, त्यांना आपल्या प्रियजनांसोबत रमजान साजरा करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे UAE च्या न्यायव्यवस्थेतील मानवतावादी दृष्टिकोन अधोरेखित झाला असून, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद ठरला आहे.