

इस्लामाबाद/दुबई : इराणमधील युद्ध संपवण्यासाठी मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची धडपड आता त्याच्याच अंगलट येताना दिसत आहे. या शांतता प्रयत्नांमुळे पाकिस्तानचा जुना मित्र राष्ट्र असलेल्या संयुक्त अरब अमिरातीशी (यूएई) संबंध ताणले गेले असून, अमिरातीने मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी कामगारांची हकालपट्टी सुरू केली आहे. यामुळे पाकिस्तानच्या परकीय चलनाचा आणि रोजगाराचा एक महत्त्वाचा स्रोत धोक्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान ने खेळी केली. मात्र, इराणकडून अमिरातीवर सातत्याने होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा पाकिस्तानने कडक शब्दांत निषेध न केल्यामुळे यूएई प्रशासन प्रचंड नाराज आहे. अमिरातीला इराणच्या हजारो हल्ल्यांचा सामना करावा लागला असून, अशा परिस्थितीत पाकिस्तानची भूमिका त्यांना संशयास्पद वाटत आहे.
'द न्यूयॉर्क टाइम्स'ने केलेल्या तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अमिरातीतील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या २० हून अधिक पाकिस्तानी शिया धर्मीय नागरिकांनी सांगितले की, त्यांना गेल्या महिनाभरात अचानक अटक करून मायदेशी पाठवण्यात आले. पाकिस्तानमधील शिया धार्मिक नेत्यांच्या अंदाजानुसार, एप्रिलच्या मध्यापासून आतापर्यंत हजारो पाकिस्तानी शिया नागरिकांना यूएईमधून बाहेर काढण्यात आले आहे. पाकिस्तानमधील ३.५ कोटी शिया लोकसंख्येचे इराणशी घनिष्ठ आध्यात्मिक संबंध आहेत, ही बाब या कारवाईमागे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकीकडे कामगारांची हकालपट्टी सुरू असताना, दोन्ही देशांच्या सरकारांनी मात्र संबंध दृढ असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठ्या प्रमाणावर नागरिक हद्दपार केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहीर अंद्राबी यांनी स्पष्ट केले की, ज्या नागरिकांनी यूएईमध्ये गुन्हे केले आहेत, केवळ त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली आहे. शिया समुदायाला विशेष लक्ष्य केले जात आहे का, या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन पाळले आहे.
राजनैतिक तणावाचे सावट आता आर्थिक संबंधांवरही पडले आहे. गेल्या महिन्यात यूएईने पाकिस्तानला दिलेले ३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागवले आहे, जे पाकिस्तानच्या एकूण परकीय चलन साठ्याचा पाचवा हिस्सा आहे. अशा कठीण प्रसंगी सौदी अरेबियाने मदतीचा हात पुढे करत ३ अब्ज डॉलर्सची ठेव पाकिस्तानकडे जमा केली आहे.
अमिरातीतील राजकीय विश्लेषक नदीम कोटेइच यांच्या मते, पाकिस्तानने यूएईला विश्वासात न घेता इराणबाबत पुढाकार घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. तर माजी मुत्सद्दी हुसेन हक्कानी यांनी म्हटले की, "इराणविरोधात पाकिस्तान आपल्याला साथ देईल अशी यूएईची अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याने अमिरातीला धक्का बसला आहे; तर अमिरातीला धक्का बसला आहे हे पाहून पाकिस्तानला आश्चर्य वाटत आहे."