

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडातील जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्राकडे भारताविरोधातील गुप्तचर आणि संवेदनशील माहिती लीक केल्याची कबुली दिलीय. पण या तपशीलाची माहिती कॅनडाच्या लोकांकडे सामायिक केलेली नाहीत, असे वृत्त द ग्लोब आणि मेलने दिले आहे. (India-Canada row) खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. पण, भारताने कॅनडाचे हे आरोप अनेकवेळा फेटाळून लावले आहेत.
द ग्लोब अँड मेलच्या वृत्तानुसार, ट्रूडो सरकारमधील राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार नॅथली ड्रॉइन यांनी मंगळवारी संसदीय पॅनेलला सांगितले की, भारतातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा कॅनडातील शीख फुटीरतावाद्यांवर झालेल्या हल्ल्यामागे हात होता.
ड्रॉइन यांनी असेही सांगितले की, माहिती लीक करण्यासाठी त्यांना ट्रूडो यांच्या अधिकृततेची आवश्यकता नाही आणि 'थँक्सगिव्हिंग डे'च्या दिवशी भारताने त्यांच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्याच्या आदल्या दिवशी वॉशिंग्टन पोस्टला कोणतीही गुप्त माहिती प्रदान केली नव्हती.
गुप्तचर सल्लागार नॅथली ड्रॉइन यांनी पुढे म्हटले आहे की, लीक केलेली माहिती ही 'संवाद रणनीतिचा एक भाग' होता. त्यांनी आणि उप परराष्ट्र मंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी, अमेरिकेतील प्रसारमाध्यमांना सध्या सुरू असलेल्या राजनैतिक वादादरम्यान कॅनडाची बाजू कळावी, यासाठी ही माहिती लीक करण्यात आली होती. "आम्ही भारताशी सहकार्य करण्याच्या भूमिकेबद्दलची माहिती पुरवली होती'', असेही त्यांनी नमूद केले आहे.
भारत आणि कॅनडा (India-Canada row) यांच्यातील संबंध आणखी ताणले गेलेत. भारताच्या एंजट्सचा कॅनडातील गंभीर गुन्हेगारी कृत्यांमध्ये थेट सहभाग असल्याचा आरोप नुकताच कॅनडाने केला होता. पण या आरोपांची पुष्टी करण्यासाठी कॅनडाने कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे भारताने हे बिनबुडाचे आरोप फेटाळून लावले आहेत. म्हणे कॅनडात असलेले भारतीय एजंट्स खलिस्तानी समर्थकांना टार्गेट करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत (Bishnoi gang) काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.