

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखाेरांनी आठवड्यात दुसऱ्यांदा लष्करावर हल्ला केला आहे. आज केलेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तान लष्कराचे ९० जवान ठार झाल्याचा दावा बलुची बंडखाेर करत आहेत. या हल्ल्यामुळेबंडखोरांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहे. एकतर हल्ल्यामुळे पाकिस्तानी सेना कमजोर पडली आहे. तर दुसऱ्या बाजूला चीनने पाकिस्तानात सुरु असलेल्या विकासप्रकल्पांसाठीची आर्थिक रसद रोखली आहे. चीनच्या दबावाखाली बलूचिस्तानवर मोठी कारवाई करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही तर चीननेही आर्थिक रसद थांबविल्याने पाकिस्तानची कोंडी झाल्याचे चित्र आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातूनच चीन-पाकिस्तान इकॉनॉमी कॅरिडोर (CPEC)जातो. त्याचे रक्षण करण्याचे काम पाकिस्तान लष्काराकडे आहे; पण लष्करच स्वतःचे रक्षण करु शकत नाही तर ते विकास प्रकल्पांचे रक्षण कसे करणार, असा सवाल चीनच्या मुत्सद्दींकडून उपस्थित केला जात आहे. रक्षा विशेषज्ञ मतानुसार, पाकिस्तान सेना सुरक्षित नाही. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे चीनने अशांत असलेल्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला स्थगिती दिली आहे. चीन- पाकिस्तान इकॉनॉमी कॅरीडॉरच्या संरक्षणासाठी पाकिस्तान लष्कराने ४०,००० सैनिक नियुक्त केले आहेत; पण या व्यतीरिक्त याठिकाणी अनेकवेळा हल्ले होतात. याचा चीनचे अधिकारी आता गंभीर्याने विचार करत आहेत.
चीन पाकिस्तान इकॉनॉमी कॅरिडॉरला सुरक्षित ठेवणे वेगळी गोष्ट आहे; पण स्वतःचे संरक्षण करणे पाकिस्तानी सैन्याला जमत नसल्याने चीन नाखूष आहे. बलुचिस्तान हे चीनचे प्रवेशद्वार आहे व हाच प्रदेश नेहमी अशांत असतो. याची दखल घेत चीनने पाकिस्तानला इशारा दिला आहे. जोपर्यंत याठिकाणी शांती प्रस्थापित होत नाही, बलूचिस्तान लिबरेशन आर्मीचा धोका कमी होत नाही तोपर्यंत याठिकाणी कोणतीही गुंतवणूक होणार नाही, असा इशारा चीनने पाकिस्तानला दिला असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर बलुचिस्तानात सैनिकी कारवाई करावी, असा दबाव चीनकडून नेहमीच पाकिस्तानवर राहतो. त्यामुळे पाकिस्ताना सैनिक बलूचिस्तान बंडखोरांच्या निशाण्यावर असतात, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. आता एकीकडे बलूच लिबरेशन आर्मीचे आव्हान असतानाच चीनकडून हाेणारी आर्थिक गुंतवणूकच बंद हाेण्याचा धाेका असल्याने पाकिस्तानची दुहेरी काेडी झाली असल्याचे रक्षा विशेषज्ञ मानतात.
बलुचिस्तानमध्ये लष्करी कारवाया कराव्या यासाठी चीनकडून पाकिस्तानवर सतत दबाव बनवला जातो; पण अगोदरच आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान दुहेरी कात्रीत सापडला आहे. २००१ पासून बलूच प्रांतात पाकिस्तानी सैन्य कारवाई करत आले आहे; पण ही कारवाई मोठ्या प्रमाणात केली तर स्थानिक पातळीवर तणाव वाढतो. दुसऱ्या बाजूला बलूचिस्तान बंडखोरांनी स्वतःला सक्षम केले आहे. अत्याधुनिक हत्यारांनी त्यांचे फायटर्स सज्ज आहेत. जर पाकिस्तानने मोठे लष्करी ऑपरेशन राबविले तर पाकिस्तानलाच मोठी किंमत माजावी लागेल. अशा प्रकारे बलूचिस्तानवर कारवाई करता येत नाही तर चीनने आर्थिक रसद थांबवल्याने पाकिस्तानची कोंडी झाली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने एक दगडात दोन पक्षी मारले आहेत.