Donald Trump | मी स्विमसूटमध्ये चांगला दिसेन का?

वजन, फिटनेस, स्वतःवरील विनोदांनी ट्रम्प यांनी रंगवला उषा व्हान्स यांचा पॉडकास्ट
Storytime with the Lady
वॉशिग्टन : ‘स्टोरीटाईम वुईथ द लेडी’ या विशेष पॉडकास्टमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.
Published on
Updated on

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेच्या २५० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सेकंड लेडी उषा व्हान्स यांच्या ‘स्टोरीटाईम वुईथ द लेडी’ या विशेष पॉडकास्टमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक वेगळाच दिलखुलास आणि मिश्कील अंदाज पाहायला मिळाला. राजकारणातील नेहमीच्या आक्रमक शैलीऐवजी ट्रम्प यांनी स्वतःच्या वजनावर, स्विमसूटवर, वाचनाच्या सवयींवर, माजी राष्ट्राध्यक्षांवर आणि उषा व्हान्स यांच्या फिटनेसवरही विनोदी शैलीत भाष्य करून कार्यक्रमात हशा पिकवला.

मुलांसाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात माजी राष्ट्राध्यक्षांच्या छंदांवर आधारित ‘प्रेसिडेंटस्‌ प्ले!’ या पुस्तकाची पाने उलगडत उषा व्हान्स आणि ट्रम्प यांनी इतिहासातील अनेक राष्ट्राध्यक्षांच्या विरंगुळ्यांवर गप्पा मारल्या. प्रत्येक चित्रावर ट्रम्प यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया देत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

जॉन क्विन्सी ॲडम्स नदीत पोहत असत, फ्रँकलिन डी. रूझवेल्ट घरातील स्विमिंग पूल वापरत असत आणि जेराल्ड फोर्ड यांना मैदानी स्विमिंग पूल आवडत असे, असा उल्लेख पुस्तकात आला. त्यावर ट्रम्प यांनी मिश्कीलपणे विचारले, ‘‘मी स्विमसूटमध्ये चांगला दिसेन की नाही, हे मला माहीत नाही. मी अनेक वर्षांपासून स्विमसूट घातलेलाच नाही. राष्ट्राध्यक्ष म्हणून इतका व्यस्त असतो की त्यासाठी वेळच मिळत नाही.’’

उषा व्हान्स यांच्या फिटनेसचे कौतुक

पोहणे, व्यायाम आणि मैदानी खेळांबाबत चर्चा सुरू असताना ट्रम्प यांनी अचानक उषा व्हान्स यांच्याकडे पाहत त्यांच्या तंदुरुस्तीचे कौतुक केले. तुम्ही खूप फिट दिसता. तुम्ही स्वतःची उत्तम काळजी घेता, हे स्पष्ट दिसते, असे म्हणत त्यांनी त्यांना शाबासकी दिली.

संभाषणादरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष विल्यम हॉवर्ड टाफ्ट यांचा उल्लेख आला. टाफ्ट हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक वजनाचे राष्ट्राध्यक्ष मानले जातात. त्यांचे वजन ३०० पौंडपेक्षा (सुमारे १३६ किलो) अधिक होते. यावर ट्रम्प यांनी स्वतःच स्वतःवर विनोद करत म्हटले, मला त्यांचा विक्रम मोडायचा नाही. तसे झाले तर तीही एक नोंद इतिहासात जाईल."

स्वतःबद्दलच्या बातम्या मात्र नक्की वाचतो

वाचनाच्या सवयीबद्दल विचारले असता ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे स्पष्ट उत्तर दिले. मी फारशी पुस्तके वाचत नाही. मी वर्तमानपत्रे वाचतो... आणि त्यातही बहुतेक वेळा माझ्याबद्दल काय लिहिले आहे तेच पाहतो, अशी त्यांनी हसत हसत कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news