

वॉशिंग्टन ःरशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या भेटीत शाब्दिक वाद झाल्याने जगाला धक्का बसला आहे. संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना व्हाऊट हाऊसमध्ये बाहेर पडण्याचे आदेश दिल्यानंतर जगातील अनेक देशांना धक्का बसला आहे. यामुळे युरोपियन युनियनमधील अनेक देशांसह आंतरराष्ट्रीय समुदायाने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांचा पाणउतारा केल्यामुळे रशियाला आनंद झाला आहे.
झेलेन्स्की युद्धापासून लष्करी पोषाखात वावरत आहेत. व्हाईट हाऊसच्या भेटीमध्येही त्यांनी हाच पोषाख परिधान केला होता. टी-शर्ट आणि ट्राऊझर घालून त्यांनी ट्रम्प यांच्यासोबत चर्चा केली. यावर पत्रकारांनी झेलेन्स्की यांना सूट का घालत नसल्याबाबत विचारले. यावर झेलेन्स्की संतप्त झाले. आपणास अडचण काय, असा प्रश्न विचारत त्यांनी युद्ध समाप्तीनंतर सूट घातला जाईल, असे सांगितले. व्हाईट हाऊससारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याचे पत्रकाराने निदर्शनास आणून दिले. यानंतर ट्रम्प यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिका भूमिका बदलत असल्याचे उभय नेत्यांच्या वादातून स्पष्ट झाले. उपाध्यक्ष वेंस यांनी रशियासोबत राजनैतिक तोडगा काढण्याची चर्चा केली. याचा अर्थ अमेरिका युक्रेनला पूर्ण पाठिंबा देण्याऐवजी कदाचित राजकीय तोडग्याच्या दिशेने वळू शकते. यामुळे युक्रेन-अमेरिका संबंधांमधील दरी वाढत असल्याचे समजते.
यावर झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या स्वातंत्र्य आणि सुरक्षेच्या आवश्यकतेवर भर दिला, ज्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र वाद झाला. परिस्थिती इतकी बिघडली की, ट्रम्प यांनी बैठक मध्येच थांबवली आणि झेलेन्स्की यांना पूर्वनियोजित दुपारच्या जेवणाच्या आधीच व्हाईट हाऊस सोडण्यास सांगितले.
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात प्रारंभी खेळीमेळीत चर्चा सुरू झाली. प्रारंभी युक्रेनमधील खनिज व्यापारावर चर्चा झाली. पण, 30 मिनिटांनंतर उपाध्यक्ष वॅन्स यांनी चर्चेची दिशा बदलली. त्यांनी झेलेन्स्की यांना रशियासोबत वाटाघाटी करण्याचा आग्रह केला. भूतकाळातील करारांचे रशियाने वारंवार उल्लंघन केल्याचे झेलेन्स्की यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर वॅन्स यांनी झेलेन्स्की यांच्यावर अनादर केल्याचा आणि अमेरिकेच्या लष्करी मदतीबद्दल आभार मानण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. यानंतर ट्रम्प यांनी लगेचच आवाज वाढवला. शांतता करार न झाल्यास युक्रेनची मदत थांबविण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला.
झेलेन्स्की यांनी शुक्रवारी युक्रेन-अमेरिका चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या तीव्र वादासाठी माफी मागण्यास नकार दिला. झेलेन्स्की यांनी या राजनैतिक परिणामांना सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. अमेरिकेने लष्करी आणि आर्थिक साहाय्य थांबविल्यास युद्धात आमच्यासमोर आव्हान असेल, अशी कबुलीही त्यांनी दिली.
या घटनेनंतर, युरोपमधील अनेक प्रमुख देशांनी झेलेन्स्कींच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीच्या संभाव्य चान्सलर फ्रेडरिक मर्ज, पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क, एस्टोनियाच्या पंतप्रधान क्रिस्टन मिशल आदी देशांच्या प्रमुखांसह स्वीडन, लिथुआनिया, लात्विया, चेक गणराज्य, स्पेन, नॉर्वे, नेदरलँडस् आणि बेल्जियम यांसारख्या देशांनीही झेलेन्स्कीच्या बाजूने पाठिंबा दर्शविला.