

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : चीनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (डउज) बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियावर जोरदार टीका केली आहे. ‘असे दिसते की, आपण भारत आणि रशियाला गमावले असून ते चीनच्या गडद छायेत गेले आहेत,’ असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
चीनच्या तियानजीन शहरात नुकत्याच पार पडलेल्या डउज परिषदेत पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग आणि पुतीन यांच्यातील जवळीक संपूर्ण जगाचे, विशेषतः पाश्चिमात्य देशांचे लक्ष वेधून घेत होती. या तिन्ही नेत्यांचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत ट्रम्प यांनी लिहिले, ‘असे दिसते की, आपण भारत आणि रशियाला खोल, अंधार्या चीनच्या हाती गमावले आहे. त्यांचे एकत्र भविष्य उज्ज्वल आणि समृद्ध होवो!’ ट्रम्प यांची ही टिप्पणी अशावेळी आली आहे, जेव्हा अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या दोन दशकांतील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहेत. ट्रम्प यांच्या कठोर व्यापार धोरणांना आव्हान देण्यासाठी शांघाय परिषद एकजुटीचा संदेश देत असल्याचे मानले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प सातत्याने भारतविरोधात भूमिका मांडत आहेत. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क दुप्पट करून 50 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे, जे इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, ट्रम्प यांच्या भारतावरील प्रचंड व्यापारी आक्रमणामुळेच भारताला चीनसोबत बसण्यास भाग पडले आहे. एकेकाळी अमेरिकेचे मित्र असलेले देश आता अमेरिकेला ‘मोठा अडथळा’ म्हणून पाहत आहेत, तर चीनची लोकप्रियता अमेरिकेपेक्षा पुढे गेली आहे.
ट्रम्प यांनी गुरुवारी युरोपीय नेत्यांवर भारताकडून तेल खरेदी करू नका, यासाठी दबाव आणला. भारत रशियन तेल खरेदी करून युरोपीय देशांना विकत आहेत. रशिया युक्रेनविरोधी युद्धामध्ये याचा वापर करीत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.