Donald Trump | आता पुलित्झर पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प नाराज

१९ पुस्तके लिहिल्याचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा उल्लेख
Donald Trump |
Donald Trump | आता पुलित्झर पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प नाराज
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुलित्झर पुरस्कार न मिळाल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. लेखनासाठी आपल्याला पुलित्झर पुरस्कार मिळायला हवा होता, असा दावा त्यांनी केला आहे. दक्षिण कॅरोलिना येथे बुधवारी झालेल्या रिपब्लिकन समर्थकांच्या सभेत त्यांनी रशियाशी संबंधित चौकशीच्या वृत्तांकनासाठी पुलित्झर पुरस्कार मिळवलेल्या पत्रकारांवर टीका केली. अनेक युद्धे थांबवण्यात आपली भूमिका असल्याचे सांगत त्यांनी नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याबद्दलही पुन्हा नाराजी व्यक्त केली.

ट्रम्प यांनी आतापर्यंत १९ पुस्तके लिहिल्याचा दावा केला आहे. १९८७ मध्ये प्रकाशित झालेले ‘द आर्ट ऑफ द डील’ हे त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. या पुस्तकातून त्यांनी व्यावसायिक व्यवहार आणि वाटाघाटींबाबतचे अनुभव मांडले होते. लेखनासाठी सन्मान मिळायला हवा होता, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

२०१८ मध्ये ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ यांना रशियाच्या २०१६ मधील अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील हस्तक्षेपाशी संबंधित वृत्तांकनासाठी पुलित्झर मिळाला होता. या वृत्तांमध्ये ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारमोहिमेचे रशियाशी असलेले संभाव्य संबंध आणि त्यासंबंधीच्या चौकशीचा आढावा घेतला होता. ट्रम्प यांनी या वृत्तांकनाला चुकीचे ठरवत पुरस्कार परत घेण्याची मागणी केली होती. मात्र, २०२२ मध्ये पुलित्झर मंडळाने तपासानंतर ही मागणी फेटाळली होती.

यंदाचे विजेते

पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारिता, साहित्य, नाटक आणि संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित सन्मान मानला जातो. २०२६ च्या पुरस्कारांमध्ये ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर आणि निर्णयांवर प्रकाश टाकणाऱ्या वृत्तांकनाचाही समावेश होता. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाच्या व्यावसायिक हितसंबंधांशी संबंधित वृत्तांकनासाठी, तर ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने सरकारच्या निर्णयांचा सरकारी विभाग आणि सामान्य नागरिकांवर झालेल्या परिणामांचा आढावा घेणाऱ्या वृत्तांकनासाठी पुरस्कार मिळवला. रॉयटर्स आणि ‘द शिकागो ट्रिब्यून’च्या वृत्तांकनाचाही गौरव करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news