

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मध्यस्थांच्या मदतीने अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा सुरू होणार असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचे सकारात्मक परिणाम झाले असून, त्यामुळे भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सने उसळी घेतली, तर कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ८३ डॉलरपर्यंत खाली आले.
आम्ही इराणवर पुन्हा हल्ला करू शकतो. तथापि, लोकांना नाहक मारण्याची इच्छा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. शांतीवार्ता कोठे होणार आणि त्यात कोण सहभागी होईल, याबद्दल ट्रम्प यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही.
सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब आमिराती आणि ओमान या प्रादेशिक मित्रांच्या मध्यस्थीने हा चर्चेचा मार्ग मोकळा झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीचा तिढा सुटण्याची आणि अणुकराराबाबत प्रगती होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
इराणने दावा फेटाळला
दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सध्या अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट करून ट्रम्प यांचा चर्चेबाबतचा दावा फेटाळून लावला आहे.
सेन्सेक्स ५४४
अंकानी वधारला
मुंबई : अमेरिका आणि इराण शांतता चर्चा सुरू झाल्याचे सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आले. शेअर निर्देशांकाने सलग चौथ्या सत्रात उसळी घेतली. सेन्सेक्स ५४४ आणि निफ्टी निर्देशांकात २९१ अंकांची वाढ झाली. सेन्सेक्स ७८,६९३ अंकांवर गेला. तर, निफ्टी निर्देशांक २४,७७४ अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्सच्या पाचशतकी वाढीमुळे बीएसईतील गुंतवणूकदारांनी चार लाख कोटी रुपयांची कमाई केली.
कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ८३ डॉलरवर
नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात नव्याने शांतता करारावर चर्चा सुरू झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर चार टक्क्यांनी घटलेे आहेत. त्यानुसार ब्रेंट क्रूड ऑईलचे भाव ८३.५६ डॉलर प्रतिबॅरलवर आले. तसेच यूएस डब्ल्यूटीआयचे भाव पाच टक्क्यांनी घटून ७९.५२ डॉलर प्रतिबॅरलवर आले. दरम्यान, एका डॉलरचा भाव १२ पैशांनी घसरून ९५.३१ रुपयांवर आला आहे.