

वॉशिंग्टन : अनिल टाकळकर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांनी शुक्रवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि एका परदेशी नेत्यामधील हा वादग्रस्त सामना थेट प्रक्षेपित केला गेला आणि आधुनिक काळातील ओव्हल ऑफिसमधील अशाप्रकारचा हा एकमेव प्रसंग ठरला.
ट्रम्प आणि व्हेन्स यांनी युक्रेनला दिलेल्या अमेरिकेच्या मदतीबद्दल झेलेन्स्की यांनी पुरेशी कृतज्ञता व्यक्त केली नाही, असा आरोप केला आणि त्यांच्या इच्छेनुसार शांतता करार मान्य करण्यासाठी दबाव टाकला. या चर्चेदरम्यान आवाज चढले, तणाव वाढला आणि ट्रम्प यांनी थेट धमकी दिली की, जर झेलेन्स्की यांनी त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही, तर अमेरिका युक्रेनला पूर्णतः सोडून देईल. झेलेन्स्की यांना मध्येच थांबवत व्हेन्स म्हणाले की, ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांसमोर स्वतःची बाजू मांडणे हा अनादर आहे आणि त्यांनी ट्रम्प यांचे नेतृत्व मान्य करून त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याचवेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना सांगितले, तुमची परिस्थिती चांगली नाही आणि तुम्ही तिसर्या महायुद्धासोबत जुगार खेळत आहात.
काही मिनिटांनंतर, ट्रम्प यांनी उर्वरित भेटच रद्द करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शांततेसाठी तयार नाहीत; कारण त्यांना वाटते की, अमेरिकेच्या सहभागामुळे त्यांना वाटाघाटींमध्ये मोठा फायदा मिळतो. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिले, मला कोणालाही फायदा द्यायचा नाही, मला शांतता हवी आहे. त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचा अनादर केला. ते जेव्हा शांततेसाठी तयार असतील, तेव्हा परत येऊ शकतात. यानंतर, झेलेन्स्की काही वेळातच काळ्या एसयूव्हीमधून व्हाईट हाऊस सोडून गेले.
शुक्रवारी झालेल्या झेलेन्स्की यांच्या आकस्मिक भेटीमागे उद्देश हा होता की, ट्रम्प यांच्या मागणीनुसार एक करार निश्चित करावा. या करारात, युक्रेनने अमेरिका आणि काँग्रेसने 2022 पासून रशियन आक्रमणाविरुद्ध दिलेल्या लष्करी मदतीच्या मोबदल्यात अब्जावधी डॉलरच्या खनिज संपत्तीचे हक्क द्यायचे होते. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्याशी संवाद सुधारण्याचा संकेत दिला होता. त्यांनी पत्रकारांसमोर मला हुकूमशहा म्हणाल्याचे आठवत नाही, असे सांगत त्यांचा सन्मान असल्याचे दर्शवले होते. त्यांनी शुक्रवारी सकाळी वेस्ट विंगच्या दरवाजावर झेलेन्स्की यांचे सन्मान गार्डसह स्वागत केले आणि हात मिळवला. मात्र, त्या हस्तांदोलनात काहीसा थंडपणा जाणवत होता.
तुम्ही करार करणार आहात किंवा आम्ही बाहेर पडू, असा इशारा देत ट्रम्प पुढे म्हणाले, या युद्धातून जर आम्ही बाहेर पडलो, तर तुम्ही स्वतःच लढाल आणि ते फारसे चांगले होणार नाही.