

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सुरुंग पेरणार्या कोणत्याही इराणी नौकेवर थेट हल्ला करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. असे प्रकार दिसताच त्यांनी अमेरिकन नौदलाला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही देशांमधील आधीच नाजूक असलेला युद्धविराम आता धोक्यात आला आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गुरुवारी सोशल मीडिया पोस्टद्वारे तसे जाहीरही केले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील पाण्यात जे कोणी सुरुंग पेरताना आढळतील, मग ती छोटी नौका असली तरीही त्यांना थेट गोळ्या घालून ठार करा. यामध्ये कोणताही संकोच बाळगू नका, असे आदेश दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराणच्या नौदलाच्या सर्व 159 युद्धनौका सध्या समुद्राच्या तळाशी आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही कृत्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सुरुंग हटवण्याचे काम वेगाने
केवळ हल्ल्याचे आदेशच नाही, तर ट्रम्प यांनी या धोरणात्मक जलमार्गातील स्फोटके हटवण्याचे काम अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आमची माइन स्विपर्स जहाजे सध्या ही सामुद्रधुनी साफ करत आहेत. हे काम केवळ सुरूच राहणार नाही, तर मी आता ते तिप्पट वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत.