

वॉशिंग्टन; पीटीआय : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख असीम मुनीर यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तासभर ताटकळत ठेवले. यामुळे पाकिस्तानी नेत्यांचा काही क्षण फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
ट्रम्प यांनी भेट घेण्यासाठी शाहबाज आणि मुनीर अमेरिकेला रवाना झाले आहेत. ते व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यानंतर ट्रम्प यांनी दोघांना तासभर भेटच दिली नाही. संयुक्त राष्ट्रातील महासभेच्या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांनी ट्रम्प यांची भेट घेतली. भेटीला उशीर झाल्याचे जाहीर केल्यानंतर व्हाईट हाऊसने या भेटीची दखल घेण्याचेही पूर्णपणे टाळले; मात्र राष्ट्राध्यक्षांची तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांसोबतची भेट त्यांच्या सोशल मीडियावर ठळकपणे दाखवण्यात आली. दरम्यान, चीन आणि इराणला शह देण्याच्या उद्देशाने ट्रम्प यांनी शाहबाज आणि मुनीर यांच्याशी चर्चा केल्याचेही समजते.
दुसरीकडे पाकिस्तानात मात्र या नेत्यांचे रेड कार्पेटवर स्वागत झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अँड्रूड्यूज एअर बेसवर आगमन झाल्यावर अमेरिकन हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने पंतप्रधान शरीफ यांचे रेड कार्पेटवर स्वागत केले. पंतप्रधानांचा ताफा अमेरिकेच्या कडक सुरक्षेत एअरबेसवरून रवाना झाला. वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये भेटीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ वाट पाहत असल्याचे दिसून आले.