

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने जगभरातील श्रीमंत व्यक्तींना लक्ष्य करत एक नवीन प्रीमियम इमिग्रेशन कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत, महागड्या ‘गोल्ड कार्ड’च्या बदल्यात अमेरिकेचे कायमस्वरूपी वास्तव्य देऊ केले जाणार आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या तिजोरीत अब्जावधी डॉलर्सचा महसूल जमा होऊ शकतो. वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी शुक्रवारी या योजनेची घोषणा केली. त्यांनी याला अमेरिकेच्या कायदेशीर इमिग्रेशन धोरणातील एक मूलभूत बदल म्हटले आहे, ज्यामध्ये देशासाठी मोठे आर्थिक योगदान देऊ शकणार्या श्रीमंत अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.
गोल्ड कार्डधारकांना विशेषाधिकार असलेले स्थायी रहिवासी म्हणून वर्गीकृत केले जाईल, ज्यांना अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याचे आणि काम करण्याचे पूर्ण अधिकार मिळतील. यात नागरिकत्वाचा मार्गही समाविष्ट असेल.
‘गोल्ड कार्ड’ कार्यक्रमांतर्गत, वैयक्तिक अर्जदारांना कायमस्वरूपी वास्तव्यासाठी 1 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 8.5 कोटी रुपये) भरावे लागतील, तर कर्मचार्यांसाठी अर्ज करणार्या कंपन्यांना प्रतिव्यक्ती 2 दशलक्ष डॉलर्स मोजावे लागतील. तुम्ही अमेरिकेसाठी 1 दशलक्ष डॉलर्सचे योगदान देऊन तुमचे असाधारण मूल्य सिद्ध करू शकता, असे सचिव लटनिक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.