

न्यूयॉर्क/लंडन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे प्रशासन सध्या अत्यंत बेदरकारपणे वागत असून, आंतरराष्ट्रीय कायद्यांपेक्षा स्वतःची शक्ती आणि प्रभाव अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांना वाटते, अशी परखड टीका संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गुटेरेस यांनी अमेरिकेच्या बदलत्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली. गुटेरेस म्हणाले की, सध्या काही देशांना ‘कायद्याची शक्ती’ बदलून त्या जागी ‘शक्तीचा कायदा’ आणायचा आहे. अमेरिकेचा सध्याचा असा ठाम विश्वास आहे की, बहुपक्षीय तोडगे आता कालबाह्य झाले आहेत. अमेरिकेला वाटते की त्यांच्या सत्तेचा आणि प्रभावाचा वापर करणे हे आंतरराष्ट्रीय नियमांपेक्षा श्रेष्ठ आहे. व्हेनेझुएलावर केलेली कारवाई आणि राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेणे, तसेच ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या, या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले.
मोठ्या जागतिक संघर्षांमध्ये संयुक्त राष्ट्रे पूर्णपणे प्रयत्नशील आहेत; परंतु त्यांच्याकडे कोणतीही लेव्हरेज (प्रभाव टाकण्याची ताकद) नाही. खरी ताकद महासत्तांकडे आहे. महासत्ता या संघर्षांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी फक्त तात्पुरते उपाय शोधत आहेत, असा आरोप त्यांनी केला. गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला ‘अकार्यक्षम’ म्हटले असून, त्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे.