

वॉशिंग्टन/तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नियोजित मोठा लष्करी हल्ला रद्द केल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इराणशी संभाव्य कराराची रूपरेषा तयार होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला; मात्र इराणने हा दावा फेटाळून लावत हे एक नवे असत्य आहे, असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी दावा केला होता की, इराणने अमेरिकेला हल्ला टाळण्याची विनंती केली होती आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासह अणू कार्यक्रमाबाबत काही अटींवर दोन्ही देशांमध्ये सहमती होत आहे; मात्र इराणच्या सरकारी आणि निमसरकारी माध्यमांनी हा दावा पूर्णपणे असत्य असल्याचे स्पष्ट केले.
इराणचे खासदार हसन घाशघावी यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार इराणकडेच राहील, असे स्पष्ट केले. दरम्यान, ओमान किनाऱ्याजवळ होर्मुझच्या प्रवेशद्वाराजवळ एका तेलवाहू जहाजावर अज्ञात क्षेपणास्त्राने हल्ला झाल्याची माहिती यूके मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्सने दिली. या घटनेमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता आणखी वाढली आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेसह इस्रायलकडून कोणतीही आक्रमक कारवाई झाल्यास त्याला निर्णायक आणि प्रमाणबद्ध प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबियाच्या वरिष्ठ नेत्यांशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हा इशारा दिला. इराणमधील काही खासदारांनीही अमेरिकेवर गंभीर आरोप केले. अरेबियन यात्रेनंतर अमेरिकेला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा काही इराणी नेत्यांनी दिला. अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या आखाती देशांना तसेच अमेरिकेला मदत करणाऱ्या किंवा सहकार्य करणाऱ्या कोणत्याही देशाला परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
इराणचे कार्यवाह संरक्षणमंत्री माजिद इब्न अल-रेझा म्हणाले, शत्रूराष्ट्रांकडून येणारी प्रत्येक धमकी ही मानसिक युद्धाचा भाग असली तरी ती इराणसाठी खरी आणि विश्वासार्ह आहे. त्यामुळे इराण कोणत्याही परिस्थितीत निष्काळजी राहणार नाही किंवा निष्क्रिय बसणार नाही. अशा प्रत्येक धोक्याच्या पार्श्वभूमीवर देशाची लष्करी सज्जता, प्रतिरोधक क्षमता आणि संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत करण्यात येईल.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिका पूर्ण तयारीत होती आणि दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी लष्करी कारवाई करण्यास सज्ज होती; मात्र, चर्चा आणि संभाव्य कराराच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला स्थगित केला.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मध्यपूर्वेतील अमेरिकन नागरिकांना परिस्थिती अधिक बिघडल्यास तातडीने देश सोडण्याची तयारी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मध्यपूर्वेचा प्रवास टाळण्याचाही सल्ला दिला आहे.