

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सध्या जगात चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी अनेक देशांवर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लादले आहेत. एवढेच नाही, तर अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांच्या काही निर्णयांचा फटका अमेरिकेलाही बसत आहे. एवढेच नाही, तर ट्रम्प यांच्या धोरणांबाबत अमेरिकन नागरिकदेखील नाराज असल्याचे बोलले जाते. याचा परिणाम म्हणजे, अमेरिकेमध्येच ट्रम्प यांची पत घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ट्रम्प हे स्वतःला एक शांतता प्रस्थापित करणारे आणि जागतिक शक्तींशी करार करू पाहणारे व जगाला अमेरिकेची ताकद दाखवू शकणारे नेते म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते, डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःला जागतिक व्यापार आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीबाबत कठोर आणि आक्रमक भूमिका मांडत असताना दिसत असले, तरी अमेरिकेमध्येच ट्रम्प यांची पत घसरत चालली आहे. या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणामधून यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे अप्रूव्हल रेटिंग 50 टक्क्यांच्या खाली गेल्यामुळे अमेरिकेतच ट्रम्प यांची पत घसरतेय का? असा सवालही आता उपस्थित करण्यात येत आहे.
देशभरातील 1,084 अमेरिकन प्रौढ व्यक्तींनी 9 सप्टेंबर रोजी केलेल्या रॉयटर्स/इप्सॉस सर्वेक्षणानुसार, ट्रम्प यांचे एकूण रेटिंग 42 टक्के समोर आले आहे. तसेच, 56 टक्के लोकांनी त्यांच्या कामगिरीला ना पसंत केले, त्याचबरोबर 13 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर यादरम्यान ऑनलाईन 30,196 प्रौढ व्यक्तींनी सर्वेक्षण करणार्या एनबीसी न्यूज डिसिजन डेस्क पोलमध्येही अशाच प्रकारचा ट्रेंड दिसून आला आहे.
गुन्हे : 43 टक्के लोकांनी ट्रम्प यांच्या हाताळणीला पाठिंबा दिला.
स्थलांतर : 42 टक्के लोकांनी ट्रम्प यांच्या हाताळणीला पाठिंबा दिला.
अर्थव्यवस्था : फक्त 36 टक्के लोकांनी पाठिंबा दिला.
राहणीमानाचा खर्च : फक्त 30 टक्के लोकांनी पाठिंबा दिला.