

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या मध्यपश्चिम आणि दक्षिण भागात बुधवारी रात्रीपासून थैमान घालणाऱ्या वादळामुळे सात जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. स्थानिक वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार, टेनेसीमध्ये पाच, मिसूरीमध्ये एक आणि इंडियानामध्ये एक मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, या वादळामध्ये अरकान्सा, मिसूरी आणि टेनेसीमध्ये भयंकर दृश्ये पहायला मिळाली. वादळांमुळे घरांची छप्परे उडाली, गाड्याही उडाल्या आणि अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. अमेरिकेतील सात राज्यांतील ४० लाखांहून अधिक लोक उत्तर टेक्सासपासून पश्चिम टेनेसीपर्यंतच्या भागात आहेत, जिथे हवामान अंदाज केंद्राने याला “प्रलंबित आणि जीवघेणा पूरस्थिती” असे संबोधले आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत ३० हून अधिक वादळांची नोंद झाली असून काही भागांमध्ये बेसबॉलच्या आकाराचे गारपिटीने नुकसान झाले आहे.
पुढील दोन दिवसांत मोठ्या वादळाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी आगामी शनिवार-रविवारी अजूनही मोठ्या वादळांची शक्यता वर्तवली आहे. वादळाच्या प्रभावामुळे मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील ३६ लाख लोकांना प्राणघातक पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो. विशेष म्हणजे, मिसिसिपी आणि ओहायो खोऱ्यांत प्रचंड पावसामुळे पूरस्थिती तीव्र होण्याचा धोका आहे. राष्ट्रीय हवामान विभागाने (NWS) या स्थितीला "असामान्य, अत्यंत गंभीर आणि संभाव्य विनाशकारी" असे संबोधले आहे. लिटिल रॉक, अरकान्सा येथील हवामान विभागाने गुरुवारी चेतावणी दिली की, "अशा ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे जिथे यापूर्वी कधीच पूर आला नव्हता." अमेरिकेत वादळांचा हा तडाखा आणखी तीव्र होण्याची शक्यता असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.