

Toilet Break Controversy Engineer Fired for Long Washroom Breaks Court Delivers Verdict
शांघाय : नोकरीच्या ठिकाणी कामातून टॉयलेटसाठी ब्रेक घेणे सामान्य आहे, पण एका कर्मचाऱ्याला हा 'ब्रेक' इतका महागात पडला की त्याला थेट आपली नोकरी गमवावी लागली आहे. चीनमधील एका इंजिनिअरला वारंवार आणि तासनतास टॉयलेटमध्ये बसण्याच्या सवयीमुळे कंपनीने घरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे, त्याचा सर्वात मोठा ‘टॉयलेट ब्रेक’ तब्बल ४ तासांचा होता.
पूर्व चीनमधील जियांगसू प्रांतातील ‘ली’ आडनावाचा एक इंजिनिअर २०१० पासून एका कंपनीत कार्यरत होता. २०१४ मध्ये त्याचा करार कायमस्वरूपी करण्यात आला होता. मात्र, एप्रिल आणि मे २०२४ दरम्यान त्याने ऑफिसच्या वेळेत तब्बल १४ वेळा दीर्घकाळ टॉयलेट ब्रेक घेतले. कंपनीने केलेल्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली की, त्याचे काही ब्रेक्स हे एक तासापेक्षा जास्त होते, तर एकदा तो तब्बल ४ तास टॉयलेटमध्ये बसून होता.
कंपनीने जेव्हा नोकरीवरून काढून टाकले, तेव्हा ली याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्याने असा दावा केला की, त्याला मूळव्याधीचा त्रास असल्याने त्याला जास्त वेळ बाथरूममध्ये बसावे लागत होते. पुराव्यादाखल त्याने डॉक्टरांकडून लिहून दिलेल्या औषध चिठ्ठ्या आणि शस्त्रक्रियेचे रेकॉर्ड्सही सादर केले. इतकेच नाही तर, ‘बेकायदेशीर हकालपट्टी’ केल्याचा आरोप करत त्याने कंपनीकडे ३.८० लाख युआन (सुमारे ३८ लाख रुपये) नुकसान भरपाईची मागणी केली.
न्यायालयात कंपनीने ली याचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज सादर केले. यामध्ये तो किती वेळा आणि किती वेळ गायब असायचा, याचे स्पष्ट पुरावे होते. कंपनीने कोर्टात सांगितले की, ली याच्या कामाचे स्वरूप तातडीचे असतानाही तो मेसेजला उत्तर देत नसे. त्याने आजारपणाबाबत आधी कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. कंपनीच्या नियमानुसार, परवानगीशिवाय कामाच्या जागेवरून गायब राहणे हे गैरहजेरी मानले जाते.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने स्पष्ट केले की, ली याने बाथरूममध्ये घालवलेला वेळ हा त्याच्या शारीरिक गरजेपेक्षा खूपच जास्त होता. तसेच त्याने सादर केलेले वैद्यकीय पुरावे हे गैरहजेरीच्या काळाशी सुसंगत नव्हते. ‘एखादा कर्मचारी तासनतास टॉयलेटमध्ये बसून राहत असेल, तर त्याच्या कामाचा भार हा सहकाऱ्यांवर पडतो आणि कंपनीचे नुकसान होते,’ असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.
अखेर, कोर्टाच्या मध्यस्थीने कंपनीने ली याला त्याच्या जुन्या योगदानाबद्दल आणि सध्याच्या बेरोजगारीचा विचार करून ३०,००० युआन (सुमारे ३.५० लाख रुपये) देऊन प्रकरण मिटवले.
ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मजेशीर आणि संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, ‘मी बॉस असतो तर याला पहिल्याच दिवशी काढले असते,’ तर दुसऱ्याने म्हटले, ‘टॉयलेटमध्ये ४ तास बसून हा नक्की काय करत होता?’
चीनमध्ये अशा घटना पहिल्यांदाच घडलेल्या नाहीत. यापूर्वी एका ड्रायव्हरने ६ मिनिटे बाथरूम ब्रेक घेतल्याने ऑर्डर मिस झाली होती, त्यालाही दंड भरावा लागला होता. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी टॉयलेटमध्ये चक्क 'टाइमर' बसवले आहेत.