

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेच्या फॉरेन एजंटस् रजिस्ट्रेशन अॅक्टअंतर्गत काही कागदपत्रे सार्वजनिक झाली आहेत. त्यानुसार गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान भयभीत झाल्याचे यामधून पुढे आले आहे.
हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेतील आपल्या मुत्सद्दी अधिकार्यांमार्फत जोरदार लॉबिंग केली होती. यासाठी अमेरिकेतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, खासदार, पेंटागॉन आणि परराष्ट्र विभागाच्या अधिकार्यांशी सुमारे 60 वेळा संपर्क साधण्यात आला होता.
अमेरिकेच्या न्याय विभागात दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, पाकिस्तानी राजनैतिक अधिकार्यांनी ई-मेल, फोन कॉल आणि वैयक्तिक बैठकांच्या माध्यमातून एप्रिलच्या अखेरीस ते 4 दिवसांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही शस्त्रसंधीसाठी बैठका सुरू ठेवल्या होत्या. अमेरिकेच्या माध्यमातून भारतावर दबाव आणून कोणत्याही स्थितीत युद्ध थांबवावे, असा पाकिस्तानचा प्रयत्न होता. यासाठी ट्रम्प प्रशासनापर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी आणि व्यापार व राजनैतिक निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी पाकिस्तानने 6 लॉबिंग फर्मवर सुमारे 45 कोटी रुपये खर्च केले होते.
याशिवाय, भारतीय दूतावासाने उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत एका बहुपक्षीय शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यासाठीही मदत मागितली होती. अनेक नोंदींमध्ये भारत-अमेरिका व्यापार वाटाघाटींच्या स्थितीवर झालेल्या चर्चेचा उल्लेख आहे.
अमेरिकन लॉबिंग फर्म एसएचडब्ल्यू पार्टनर्स एलएलसीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय दूतावासानेही अमेरिकन सरकार आणि तेथील अधिकार्यांशी संपर्क वाढवण्यासाठी त्यांच्या फर्मची सेवा घेतली होती. भारतीय दूतावासानेही लॉबिंग फर्मची मदत घेतली. ट्रम्प प्रशासनासोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारतीय दूतावासाच्या चर्चेत त्यांनी मदत केली. या फर्मने एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यान भारतीय दूतावासासाठी काम केले.