

अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डी. सी. : इराणशी वाटाघाटी आणि चर्चेची वेळ आता निघून गेली असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केले आहे. याचा अर्थ या देशावरील लष्करी कारवाई कधीही होऊ शकते, असा लावला जात आहे. मात्र, ट्रम्प यांच्या काही राजकीय सहयोगींनी या हल्ल्यामुळे असणार्या संभाव्य धोक्याची जाणीवही ट्रम्प यांना करून दिली आहे.
‘व्हाईट हाऊस’मध्ये मंगळवारी वरिष्ठ अधिकार्यांची बैठक होऊन लष्करी पर्यायांवर विचारविनिमय करण्यात आला. ट्रम्प यांनी इराणमधील सरकारविरोधी आंदोलकांना मदत करण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. मात्र, काही राजकीय सहयोगींनी याबाबत सावध पवित्रा घेत असल्याचे दिसते. आणखी एका परदेशातील संघर्षात अडकल्याचा प्रतिकूल परिणाम ‘अमेरिका फर्स्ट’च्या धोरणावर होऊ शकतो. इराणवरील संभाव्य हल्ला म्हणजे ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणापासून फारकत घेतली, असा अर्थ त्यांचे ‘मेक अमेरिकी ग्रेट अगेन’वर विश्वास ठेवणारे त्यांचे समर्थक लावू शकतात. त्याची किंमत त्यांना देशांतर्गत राजकारणात मोजावी लागू शकते.