न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन
अमेरिकेमध्येच नव्हे तर जगाच्या पाठीवर मातब्बर असणाऱ्या तब्बल ५९ कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या स्थलांतर धोरणांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. स्थलांतरांसाठी घालण्यात येत असलेल्या नवनवीन नियमांमुळे अनिश्चितता वाढत असून त्यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असल्याचा इशारा या आघाडीच्या कंपन्यांनी दिला आहे.
अमेरिकन कंपन्यांच्या ज्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ट्रम्प प्रशासनाला पत्र पाठवले आहे, त्यामध्ये ॲपलचे टीम कुक, जेपी मॉर्गन, चेस ॲन्ड कंपनीचे जेमी डीमॉन, अमेरिकन एअरलाईन्सचे दौग पार्केर आदींचा समावेश आहे. या सर्वांनी स्थलांतरित लोकांबाबत सातत्याने बदलत असलेल्या निर्णयांमुळे त्यांचे कर्मचारी चिंतेत सापडल्याचे नमूद केले आहे. नवीन धोरणांनुसार कुशल कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचे वर्क परमीट रद्द करण्याची शक्यता वाढली आहे.
संघीय सरकारांनी स्थलांतरितांबाबत पुर्नविचार सुरु केला आहे, त्यामुळे कुशल व कायद्याचे पालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवनावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अन्यथा अमेरिकेच्या स्पर्धात्मकतेवर विपरित परिणाम होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.
बदलत्या स्थलांतरित धोरणांमुळे सर्वाधिक फटका एच -वनबी व्हिसा धारकांना बसणार आहे. भारतीय कंपन्यांनी सर्वांधिक एच -वनबी व्हिसाचा फायदा घेतला आहे. अमेरिकेत याच व्हिसावर तब्बल एक तृतियांश कर्मचारी काम करत आहेत. अमेरिकेतील बँकिंग, ट्रॅव्हल आणि कर्मशियल सर्व्हिसेस या पूर्णपणे भारतीय आय टी कर्मचाऱ्यांवर विसंबून आहेत.