

पुढारी ऑनलाईन डेस्क: गोल्फपटू टायगर वूड्स याने त्याच्या नव्या रिलेशनशिपबाबतची माहिती उघड केली आहे. टायगर सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पूवाश्रमीची सून व्हेनेसा ट्रम्प हिला डेट करत आहे. त्याने रविवारी (दि. 23 मार्च) नुकतेच सोशल मीडियातून दोघांचे एकत्रित फोटो शेअर करत रिलेशनशिपची घोषणा केली आहे. (Tiger Woods-Vanessa Trump relationship)
टायगरने X (ट्विटर) वरील पोस्टमध्ये आनंद व्यक्त करत म्हटले आहे की, "तुझ्या सोबत आयुष्य अधिक सुंदर आहे! आम्ही एकत्र या प्रवासाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत." दरम्यान त्याने त्याने आपल्या जवळच्या लोकांच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंतीही केली.
टायगरने दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत वूड्स आणि व्हेनेसा ट्रम्प एकत्र दिसत होते, तर दुसऱ्या फोटोत दोघे झोळीत बसून आराम करताना दिसत होते. जिथे व्हेनेसाने वूड्सच्या छातीवर हात ठेवलेला दिसून येतो.
व्हेनेसाची मुलगी काई येथील द बेन्जामिन स्कूलमध्ये शिकते. याच शाळेत टायगर वूड्सची मुले सॅम आणि चार्ली देखील शिक्षण घेत आहेत. काई आणि चार्ली नुकतेच एका कनिष्ठ गोल्फ स्पर्धेत सहभागी झाले होते. तर टायगर आणि व्हेनेसा सॅन दिएगोमधील टॉरे पाइन्स येथे एकत्रित दिसले होते.
कोण आहे व्हेनेसा ट्रम्प?
व्हेनेसा ट्रम्प हिचा विवाह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर याच्यासोबत झाला होता. ते दोघेही 12 वर्षे एकत्र होते. या काळात त्यांना पाच मुलेही झाली. त्यानंतर त्यांचा संसार तुटला आहे.
टायगर शक्यतो त्याच्या खासगी आयुष्याबाबतजाहीरपणे बोलत नाही. त्यामुळेच त्याने असे सोशल मीडियातून थेट रिलेशनशिपची कबुली दिल्यामुळे आश्चर्यही व्यक्त होत आहे. यापुर्वी 2013 मध्ये त्याने स्कीयर लिंडसे व्हॉनसोबतच्या रिलेशनशिपची पुष्टी करताना अशीच पोस्ट केली होती.
स्वतःच फोटो पोस्ट केल्याने पापाराझींच्या फोटोंची किंमत कमी होते आणि प्रसारमाध्यमांतील तर्कवितर्कांनाही आळा बसतो, असेही टायगर त्यावेळी म्हणाला होता.
टायगरच्या यापुर्वीच्या रिलेशनशिप्स
48 वर्षीय वूड्सला त्याच्या माजी पत्नी एलिन नॉर्डेग्रेनपासून दोन मुले आहेत. 2010 मध्ये टायगरचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला होता. एरिका हर्मनसोबत तो रिलेशनशिपमध्ये होता ते नाते 2002 मध्ये संपुष्टात आले. त्यानंतर त्यांच्यात कायदेशीर वाद सुरू होते, जे कालांतराने मागे घेतले गेले.