फेडरल रिझर्व्हने अखेर व्याजदर घटवले; अमेरिकेत महागाई नियंत्रणात, आता लक्ष तेजीकडे
पुढारी ऑनलाईन डेस्क : Federal Reserve Interest Rates : अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने अखेर व्याजदरात 50 बेसिक पॉईंटने कपात करण्याचा निर्णय घेतला. फेडरल रिझर्व्हने 2020मध्ये व्याजदरात कपात केलेली होती. पण वाढत्या महागाईवर नियंत्रणात ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याजदर सातत्याने वाढवले होते. अमेरिकेतील आर्थिक तेजी किंवा मंदी, रोजगाराचा दर या सगळ्यांचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, त्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या आजच्या घोषणेकडे जगाचे लक्ष लागून राहिले होते.
फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरॉम पॉवेल यांनी ऑगस्ट महिन्यात व्याजदर कमी करण्याची घोषणा केली होती. जुलै महिन्यात अमेरिकेतील महागाईचा दर २.९ टक्के इतका कमी आल्यानंतर पॉवेल यांनी आता व्याजदर कमी करण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले होते. बुधवारी फेडरल ओपन मार्केट कमिटीने या निर्णय जाहीर केला.
अमेरिकेची अर्थव्यवस्था संमिश्र संकेत देत होती. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर 4.2 टक्के इतका खाली आला आहे. नोकरकपात जरी कमी असली तरी अमेरिकेत नवी भरती सुरू नाही, असे NBCने बातमीत म्हटले आहे.
जगावर कसा परिणाम होणार?
अमेरिकेतील तेजी किंवा मंदीचा परिणाम जगावर होत असतो. व्याजदर कमी केल्याने अमेरिकेतील कंपन्या कमी व्याजदरात कर्ज घेतील आणि गुंतवणूक वाढवतील. तर ठेवीवरील व्याजदर घटू लागतील त्यामुळे शेअरबाजारात गुंतवणुकीचा कल वाढतो. तसेच हाँगकाँग आणि आखाती देशातील मध्यवर्ती बँका व्याजदराचा निर्णय फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानुसार ठरवतात.