पुढारी ऑनलाईन डेस्क : म्यानमारमध्ये यागी चक्रीवादळानंतर आलेल्या पूर आणि भूस्खलनात मरण पावलेल्या लोकांची संख्या 220 हून अधिक झाली आहे, तर जवळपास 80 जण अद्यापही बेपत्ता आहेत. तेथील लष्करी सरकारने ही माहिती दिली आहे.
गेल्या आठवड्यात म्यानमारला यागी वादळाचा तडाखा बसला. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला. त्यातच भूस्खलनाच्याही अनेक घटना घडल्या. या सर्व नैसर्गीक आपत्तीमध्ये किमान 220 हून लोकांना प्राण गमवावे लागले. सरकारी माध्यमांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. गृहयुद्धग्रस्त देशात दळणवळणाच्या समस्यांमुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
असीयान मानवतावादी सहाय्य समन्वय केंद्राच्या मते, यागी वादळाने प्रथम व्हिएतनाम, उत्तर थायलंड आणि लाओसला प्रभावित केले. व्हिएतनाममध्ये सुमारे 300, थायलंडमध्ये 42 आणि लाओसमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला. व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमारला या चक्रीवादळाचा सर्वाधिक सामना करावा लागला. भारताने रविवारी 'सद्भाव' मोहिमेअंतर्गत प्रभावित झालेल्या देशांना आवश्यक मदत सामग्री पाठवली.
यावर्षी आशियातील सर्वात शक्तिशाली वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'यागी'च्या प्रभावामुळे म्यानमार, लाओस आणि व्हिएतनामचे विविध भाग भीषण पुराच्या तडाख्यात सापडले. द. चीन समुद्रात वादळाच्या प्रभावाच्या आठवडाभर आधी भूस्खलन झाले.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘ऑपरेशन सद्भाव' हा भारताच्या 'ॲक्ट ईस्ट' धोरणाच्या अनुषंगाने आसियान (दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना) प्रदेशात मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणासाठी योगदान देण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. भारताने व्हिएतनामला मोठी आर्थिक मदतही पाठवली आहे.