जिनिव्हा : पुढारी ऑनलाईन
संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात आहे. अद्याप लस उपलब्ध झाली नसल्याने कोरोनाला रोखता आलेले नाही. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोक्याची सूचना दिली आहे. जर देशांनी आरोग्याच्या बाबतीय ठोस खबरदारी घेतली नाही तर कोरोनामुळे अत्यंत वाईट स्थिती होत जाईल, अशी भीती आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
वाचा : देशात कोरोना रुग्णसंख्येने पार केला ९ लाखांचा टप्पा
अनेक देश चुकीच्या दिशेने निघाले आहेत, मात्र कोरोना व्हायरस लोकांचा नंबर वन शत्रू बनत चालला आहे. जर मूलभूत गोष्टींचे पालन केले नाही तर ही महामारी वाढणार आहे आणि दिवसेंदिवस परिस्थिती आणखीनच वाईट आणि वाईट होत जाईल, असा इशारा डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेसेसस यांनी दिला आहे.
जगातील १ कोटी ३२ लाख लोक कोरोनामुळे बाधित झाले आहेत. तर आतापर्यंत ५ लाख ७५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेशी संपूर्णपणे संबंध तोडत असल्याची घोषणा नुकतीच अमेरिकेने अधिकृत पत्राद्वारे केली आहे. अमेरिका आता यापुढे जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने डब्ल्यूएचओला या संदर्भात आपला निर्णय अधिकृत पत्राद्वारे कळविला आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप आपल्याला याबाबत काही अधिसूचना मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
वाचा : भारतासह जग कोरोना 'व्हॅक्सिन'च्या वळणावर!
ट्रम्प सरकारने कोरोना व्हायरस प्रकरणात चीनच्या इशाऱ्यावर डब्ल्यूएचओ काम करत असल्याचा आरोप केला होता. तसेच अमेरिकन सरकारने एप्रिलपासून डब्ल्यूएचओला दिलेला निधी थांबवला होता. त्याचवेळी हा इशारा दिला होता.
चीनने कोरोना विषाणूची माहिती देण्यास विलंब केला. त्यामुळे बघता बघता दोन महिन्यातच कोरोनाचा विषाणू जगभर पसरला. त्या पार्श्वभूमीवर या विषाणूची उत्पत्ती कशी झाली याचे मूळ शोधून काढण्यासाठी डब्ल्यूएचओची टीम चीनमध्ये जाणार आहे.
वाचा : 'रशियाच्या लस चाचणीची ही तर फक्त सुरुवात, अती घाई नको'