चिआंग राय (थायलंड) : पुढारी ऑनलाईन
थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या १२ मुलांची सुटका करण्यात आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची तब्येत ठीक झाली असून त्यांना काल डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पहिल्यांदाच सर्व मुले माध्यमांच्या समोर आली. यावेळी मुलांनी आणि प्रशिक्षकाने बचावकार्य चमत्कारीक असल्याचे सांगत आभार मानले. तसेच आपला गुहेतील अनुभव सांगताना दोन आठवडे गुहेत राहणे आणि त्याचा जीवनावर काय परिणाम होईल याबद्दल त्यांनी चर्चा केली.
गुहेमध्ये जाणे धोकादायक असल्याची जाणीव प्रशिक्षकाला होती तरीही गुहेत का गेले? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यावर उत्तर देताना प्रशिक्षक एकापोलने सांगितले की, संघातील काही मुले कधीच गुहेत गेली नव्हते. त्यांना गुहेत जाऊन ती आतून पाहण्याची इच्छा होती. तसेच खेळाडू नेहमीच फुटबॉल सरावानंतर वेगवेगळ्या खेळात, ट्रेकींग, सायकलिंग यात सहभागी होत असतात. त्यातलाच एक भाग म्हणून फिरायला गेलो होतो.
गुहेत गेल्यानंतर एक तासानंतर सर्वांनी बाहेर यायाचा निर्णय घेतला. मात्र गुहेतून बाहेर येण्याचा मार्ग पाण्यामुळे बंद झाला होता. त्यावेळी एका मुलाने विचारले की, आपण वाट चुकलो आहोत का? पण काही वेळानंतर आम्हाला समजले की आपण गुहेत अडकलो असून बाहेर जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. गुहेतून बाहेर जाण्याचा एकच मार्ग असल्याची जाणीव झाल्यानंतर एका सुरक्षित ठिकाणी थांबण्यासाठी गुहेत आत गेलो असे प्रशिक्षक एकापोलने सांगितले.
गुहेत पाणी पिऊन राहिले जिवंत
गुहेत आत गेल्यानंतर ते अशा ठिकाणी थांबले जिथे वरच्या बाजूने पाणी येत होते. याच पाण्याचा पिण्यासाठी वापर करुन ते जिवंत राहीले. फुटबॉल सराव झाल्यानंतर सर्व मुलांनी जवळ असलेले खाद्यपदार्थ संपवले होते. त्यामुळे खाण्यासाठी काहीच शिल्लक राहीले होते. अशावेळी किमान पिण्यायोग्य पाणी असलेल्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. २३ जुनला गुहेत गेलेल्या संघाशी ३ जुलैला संपर्क झाला होता. दहा दिवस त्यांनी पाणी पिऊन दिवस काढले. याचा अनुभव सांगताना सर्वात लहान खेळाडूने सांगितले की, मला भूक लागू नये म्हणून १० दिवसात मी खाण्याबद्दल विचार न करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात सर्वांनाच आश होती की पाणी कमी होईल आणि कोणीतरी मदतीसाठी येईल.
पावसाचा जोर वाढल्यानंतर गुहेतील पाणी पातळी वाढू लागली. यावेळी संघाने उंच जागा शोधली. इतकेच नाही बाहेर पडण्यासाठी वाट शोधताना खोदण्याचा विचार केला होता असे प्रशिक्षकाने सांगितले.
…तेव्हा स्वत:बद्दल अपराधीपणाची भावना
मुलांना आणि प्रशिक्षकाला गुहेतून बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन बचावपथक काम करत होते. यात एका माजी नौदल सैनिकाचा मृत्यू झाला हे समजल्यानंतर प्रशिक्षक एकापोल स्वत:ला अपराधी समजत होता. पत्रकार परिषदेवेळी सर्वांनी बचावथकातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि माजी नौदल सैनिक कनान यांना श्रद्धांजली वाहीली.
बाहेरील व्यक्तीची पहिली भेट चमत्कारीक
तब्बल ९ दिवस गुहेत अडकल्यानंतर त्या मुलांना शोधण्यात यश आले. त्यानंतर आठवडाभर बचावकार्य सुरु होते. जेव्हा पहिल्यांदा बचावपथकातील स्कुबा डायव्हरला टीम भेटली तेव्हा तो चमत्कारच वाटला होता असे मुलांनी सांगितले. त्यावेळी काय बोलावे आणि काय नको असेच झाले होते. विशेष म्हणजे या सर्वांच्या टीममध्ये एकाला इंग्लिश बोलता येत होते. त्यानेच डायव्हरशी संवाद साधला आणि सर्व परिस्थितीची माहिती दिली.
आयुष्यभरासाठी धडा मिळाला
या घटनेतून आयुष्यभराचा धडा मिळाला. यापुढे कधीच बेजबाबदारपणे वागणार नाही असे प्रशिक्षक एकापोलने सांगितले. काही मुलांनी नेव्हीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. यापैकी काही मुलांनी आई-वडिलांची माफी मागितली.
थायलंडमधील गुहेत २३ जुनला १२ मुले आपल्या प्रशिक्षकासोबत गेली होती. त्यानंतर चार दिवसांनी ती गुहेत बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. त्यांचा शोध ३ जुनला लागला होता. त्यानंतर एक आठवडाभर बचावपथक काम करत होते. पाण्याच्या प्रवाहामुळे बचावकार्यात अडचण येत होती. अशाही परिस्थिती सर्व मुलांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर केवळ थायलंडमधील नागरिक, मुलांचे पालक यांनीच नव्हे तर जगानेही सुटकेचा निश्वास टाकला होता.