पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा जिल्ह्यातील बन्नू कॅन्टोन्मेंटच्या परिसरात मंगळवारी (दि.४) सायंकाळी लष्करी तळावर झालेल्या दुहेरी आत्मघातकी हल्ल्यात पाच सैनिकांसह १८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पाकिस्तानमधील 'द डॉन'ने दिले आहे. दरम्यान, बन्नू कॅन्टोन्मेंटवर हल्ला करणारे सर्व १६ दहशतवादी चकमकीत ठार झाल्याचा दावा पाकिस्तान लष्कराने केला आहे.
पाकिस्तान लष्कराच्या मीडिया अफेयर्स शाखेने सांगितले की, हल्ल्यात मारल्या गेलेल्या १६ दहशतवाद्यांमध्ये चार आत्मघातकी हल्लेखोरांचा समावेश आहे. 'द डॉन;ने पाकिस्तानी लष्कराचा हवाला देत वृत्त दिले आहे की, मंगळवारी सायंकाळी बन्नू कॅन्टोन्मेंटच्या परिसरात दहशतवाद्यांनी दोन स्फोटकांनी भरलेली वाहने घुसवत उच्च सुरक्षा क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने म्हटले आहे की, सैन्याने घुसखोरांना यशस्वीरित्या रोखले आणि चार आत्मघातकी हल्लेखोरांसह सर्व १६ दहशतवाद्यांना ठार केले.
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच सैनिकांनी आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आत्मघातकी स्फोटांमुळे निवासी इमारतीचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यात १३ नागरिक ठार झाले आणि इतर ३२ जण जखमी झाले आहेत. जैश अल फुर्सानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा गट तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या अनेक गटांपैकी एक आहे.