

काबुल/इस्लामाबाद : ब्रिटिशांनी आखलेली ड्युरंड लाईन ही अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील सीमारेषा अफगाण तालिबान सरकारने अमान्य केली असून, ड्युरंड रेषेपलीकडे पाकिस्तानच्या हद्दीत तालिबानी योद्धे नुसतेच शिरलेले नाहीत, तर पाक चौक्यांची धुळधाण त्यांनी सुरू केली आहे. रविवारी व सोमवारी मिळून पाकिस्तानच्या 19 सैनिकांचा तालिबानने खात्मा केला आहे.
तालिबानी योद्ध्यांच्या दहशतीने अनेक पाकिस्तानी सैनिकांनी आपापल्या ताब्यातील चौक्या सोडून पोबारा केला आहे. तालिबानी योद्ध्यांनी ड्युरंड रेषेवरील पाकिस्तानच्या अनेक चौक्या उडवून दिल्या आहेत किंवा जाळून टाकल्या आहेत. गोजगढी, माटा सांगर, कोट राघा आणि तरी मेंगल परिसरांवर तालिबानने ताबा मिळवला असून, पाक सैनिकांना येथून पळवून लावले आहे. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने, खुर्रम आणि उत्तर वजिरिस्तानातील तालिबान्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावल्याचा दावा केला आहे. आठ अफगाण तालिबानी योद्ध्यांना ठार मारल्याचा दावाही पाक लष्कराने केला आहे.
तीन अफगाण नागरिकांचा मृत्यू
पाकिस्तान अफगाणिस्तानात एकापाठोपाठ हल्ले करत असून, पकटिकातील एका मशिदीवर पाकने केलेल्या मोर्टार हल्ल्यात 3 अफगाण नागरिक मरण पावल्याचे वृत्त आहे. स्थानिक अफगाण नागरिकांनी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी केली आहे.