सीरियातील संघर्ष चिंतेचा | पुढारी

दमास्कस : वृत्तसंस्था  

सीरियातील अंतर्गत युद्धाचा उडालेला भडका आज जागतिक पातळीवर जाऊन पोहोचला आहे. सीरियामध्ये अमेरिकेकडून हल्ला करण्यात आला आहे.  मात्र, तेथील सामान्य जनतेला याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. नेमका हा संघर्ष काय आहे, याबाबत घेतलेला हा आढावा…

सीरियामध्ये 2000 मध्ये बशर अल-असद यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. दहा वर्षांच्या कार्यकाळात असद यांनी जनतेला नाराज करणारा निर्णय घेतला. यामुळे जनतेमध्ये असद यांच्याविरोधात रोष निर्माण झाला. 2011 मध्ये सीरियात असद यांच्याविरोधात आंदोलने होऊ लागली. जनता उघडपणे असद यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागली. मात्र, असद यांनी सत्तेचा दुरुपयोग करून दबावतंत्र सुरू केले. आंदोलकांवर कठोर कारवाई करण्यात येऊ लागली. यातूनच अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडली.

अमेरिका,फ्रान्स, ब्रिटनचा विरोध

सीरियातील या परिस्थितीची दखल घेत अमेरिकेने असद यांना विरोध करण्यास सुरुवात केली. अमेरिकेला फ्रान्स आणि ब्रिटनचा पाठिंबा मिळाला. अमेरिका असद यांना पदावरून दूर करण्याच्या तयारीत होती. मात्र, रशियाचा असद यांना पाठिंबा असल्याने ते शक्य झाले नाही.

शिया-सुन्‍नी वादही कारणीभूत

सीरियामध्ये शिया व सुन्‍नी पंथामध्ये वाद आहे. असद हे शिया पंथाचे असल्याने त्यांना होणार्‍या विरोधामागे हेही एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. 

'इसिस'चा शिरकाव

सीरियातील या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेत 'इसिस' या दहशतवादी संघटनेने तेथे शिरकाव केला. सीरियातील काही भागांमध्ये या संघटनेने स्वतःचे बस्तान बसविले आणि तो भाग आपल्या ताब्यात घेतला. यामुळे असद यांना अंतर्गत विरोधकांबरोबर 'इसिस'चाही सामना करावा लागत आहे. यासाठी रशिया आणि इराणीची मदत मिळत आहे. दुसर्‍या बाजूला अमेरिकाही 'इसिस'चा पाडाव करण्यासाठी ब्रिटन आणि फ्रान्सच्या मदतीने सीरियातील 'इसिस'च्या ठिकाणांवर हल्ले करत आहे. 

भकास बनतोय सीरिया

अंतर्गत युद्धामुळे सीरियातील अनेक नागरिकांनी जगातील अन्य देशांमध्ये आश्रय घेतला आहे. सीरियातील 70 टक्के प्रदेश युद्धामुळे भकास बनला आहे. तसेच हजारो निरपराध नागरिकांचे बळी गेले आहेत.

 

Tags : Syrian, conflict, concerns,

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news