

नासाचे अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर हे केवळ ८ दिवसांच्या मोहिमेवर गेले होते, परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यांची पृथ्वीवर परत येण्याची प्रक्रिया 286 दिवसापर्यंत लांबली. गेल्या ९ महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकले होते. आज पहाटे ते दोघेही पृथ्वीवर परतले.
बोईंग स्टारलायनरवरून 5 जून 2024 रोजी अंतराळात गेलेल्या या दोघांनी आज स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर पुनरागमन केले. त्यांच्यासोबत नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गॉर्बुनोव्ह हेदेखील होते.
अंतराळयानाने परतीच्या प्रवासादरम्यान आपल्या पॅराशूटद्वारे फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी लँडिंग केले. नासाच्या पथकाने यानाचे हॅच उघडले आणि अंतराळवीरांना बाहेर येण्यासाठी मदत केली. सुनिता विलियम्स यानातून बाहेर आल्यानंतर हात उंचावून आनंद व्यक्त करताना दिसल्या. याऐतिहासिक मोहिमेचे सर्व जगातून कौतूक होत आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. वी नारायणन यांनी X वर पोस्ट करत अभिनंदन केले आहे.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (ISS) विस्तारित मोहिमेवर यशस्वीपणे कार्य करून सुरक्षित परतलात, हे अतिशय गौरवशाली आहे. नासा, स्पेसएक्स आणि अमेरिकेच्या अवकाश संशोधनातील योगदानाचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तुमची जिद्द आणि समर्पण जगभरातील अवकाशप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे.
परराष्ट्र सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने तुमचे मनःपूर्वक स्वागत करतो व तुम्हाला उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देतो.
भारत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकसित राष्ट्र होण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रवासात अवकाश संशोधन क्षेत्रात तुमच्या कौशल्याचा लाभ घेण्याची आम्हाला इच्छा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनिता विलियम्स यांना खास पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले. 1 मार्च रोजी लिहिलेल्या या पत्रामध्ये मोदींनी नमूद केले की, अमेरिकेच्या भेटीदरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत सुनिता विलियम्स यांच्या स्थितीबद्दल चर्चा केली होती. "1.4 अब्ज भारतीय तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगतात. तुमच्या जिद्दीने संपूर्ण जगाला प्रेरणा मिळाली आहे," असे पीएम मोदींनी पत्रात नमूद केले.
दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने सुनिता विलियम्स आणि बु विल्मोर यांना अनेक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अवकाशामधील गुरुत्वाकर्षणाचा अभाव हाडांची घनता कमी करतो, स्नायू कमकुवत होतात, तसेच रेडिएशनमुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.