Sunita Williams आणि Butch Wilmore यांना 'बेबी फीट'चा धोका !

पृथ्वीवर ॲडजस्ट करताना कठीण जाणार, 280 हून अधिक दिवसांपासून अंतराळ स्थानकात वास्तव्य
Sunita Williams | Butch Wilmore |
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नासा या अंतराळ संशोधन संस्थेचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर आता पृथ्वीवर परतण्यासाठी सज्ज झाले आहेत. बुधवार 19 मार्चपर्यंत हे दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. तथापि, त्यांचा हा रिटर्न प्रवास आणि त्यानंतरचे जीवन त्यांच्यासाठी काही काळ तरी सोपे नसणार आहे. कारण सूक्ष्म गुरूत्वाकर्षण स्थितीतून ते पुन्हा पृथ्वीवरील गुरूत्वाकर्षण स्थितीत परतणार आहेत. त्यामुळे त्यांना 'बेबी फीट' या विकाराचा धोका असून पृथ्वीवर चालताना आणि वावरताना त्यांना सुरवातीचा काही काळ अवघड जाणार आहे. Sunita Williams and Butch Wilmore return trip to earth

काय आहे बेबी फीट?

अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना बऱ्याचदा विविध शारिरीक समस्यांना तोंड द्यावे लागते. याचे काही व्हिडिओदेखील यु-ट्युबवर उपलब्ध आहेत. यातीलच एक विचित्र स्थिती म्हणजे 'बेबी फीट'. या स्थितीत अंतराळवीरांना पृथ्वीवर चालताना अडचणी येतात. अंतराळ स्थानकात मायक्रोग्रॅव्हिटी (सूक्ष्म गुरूत्वाकर्षण) असलेल्या स्थितीत अंतराळवीरांना राहावे लागते. त्यामुळे त्यांना तरंगण्याची सवय असते. तरंगत सर्व कामे करावी लागतात. तसेच विविध वस्तू वापरण्यासाठी हातांचा वापर केला जातो. या काळात चालावे लागत नाही. तरंगतच इकडून तिकडे जाणे देखील हातांनी हलका जोर लावून होत असते. त्यामुळे अंतराळ स्थानकात अंतराळवीरांच्या पायांचा फार वापर होत नाही. त्यामुळे पायांना पुरेशा दाबाचा अनुभवच येत नाही. पायांवर दाबच न आल्याने किंवा न जाणवल्याने त्यांचे तळवे कालांतराने मऊ होतात. त्यामध्ये पुरेसा जाडसरपणा राहत नाही. याच स्थितीला ‘बेबी फीट’असे म्हणतात.

चालताना तोल जातो, अस्वस्थ वाटते...

पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीर पुन्हा गुरूत्वाकर्षण स्थितीत येतात. सूक्ष्म गुरूत्वाकर्षण स्थितीतून थेट पृथ्वीवर परतल्याने त्यांचे पाय अतिसंवेदनशील होतात. त्यामुळे काही महिने सॉफ्ट शूज वापरल्यानंतर अनवाणी पायाने चालल्यावर जी फिलिंग येते तसा अनुभव अंतराळवीरांना येतो. त्यामुळे अंतराळवीरांचा चालताना अडचण होते. त्यांना अस्वस्थ वाटू शकते. त्यांचा तोलही जातो. ते एकाबाजूला झुकून पडण्याची शक्यता असते.

नासा अंतराळवीरांना कशी मदत करते?

पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणात ॲडजस्ट करण्यासाठी नासा रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम्स चालवते. यात मऊ पृष्ठभागावर चालण्यास सुरवात, पाय आणि मांडीखालील घोट्यापर्यंतचा भाग यांचा व्यायाम, तोल राहावा यासाठी ट्रेनिंग, पोषकतत्त्वांसाठी आणि हायड्रेट राहण्यासाठी डाएट इत्यादीची काळजी नासाकडून घेतली जाते.

अंतराळ प्रवासाचे पायावर होणारे इतर परिणाम

दरम्यान बेबी फीट याशिवायही काही परिणाम अंतराळवीरांच्या पायांवर होत असतात. रक्तप्रवाहात अडचण, पायाच्या आकारात फरक, स्नायूंमध्ये बिघाड, हाडे ठिसूळ होणे, समतोलपणा बिघडणे इत्‍यादी परिणाम होतात. गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेणे ही एक आव्हानात्मक प्रक्रिया आहे. सुनिता आणि विल्मोर यांना त्यांच्या सर्वसामान्य हालचाली परत करण्यासाठी काही आठवड्यांच्या पुनर्वसन सत्रातून जावे लागेल. नासाची वैद्यकीय टीम त्यांच्या रिकव्हरीवर लक्ष ठेऊन असणार आहे.

अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे गेल्या जवळपास 280 दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये (ISS) मध्ये आहेत. गेल्यावर्षी 5 जून 2024 रोजी सुनिता आणि विल्मोर हे बोईंग स्टारलायनर या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून हे उड्डाण झाले होते. आता हे दोघेही पृथ्वीवर परतण्याबाबत सर्वांनाच उत्सूकता लागून राहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news