

तेहरान; वृत्तसंस्था : इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय जहाजांकडून अव्वाच्या सव्वा कर वसूल करण्यास सुरुवात केली आहे. तेहरानच्या मंजुरीने या सागरी मार्गातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून सरासरी १५ ते २० लाख डॉलर्स (सुमारे १२.५ ते १६.६ कोटी रुपये) शुल्क इराण आकारत आहे. आपली ऊर्जा गरज भागवण्यासाठी युरोपीय राष्ट्रांच्या खर्चात विनाकारण वाढ होत आहे. त्यामुळे यातून युरोपीय राष्ट्रे विरुद्ध इराण अशा नव्या संघर्षाची भीती सामरिक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
इराणच्या संसदीय बजेट आणि नियोजन आयोगाचे सदस्य मोहसेन झंगेनेह यांनी 'फार्स' या निमसरकारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत टोल आकारणीची माहिती दिली. विशेष म्हणजे हे शुल्क केवळ रोख रकमेतच नाही, तर 'टेदर' या अमेरिकन डॉलरशी जोडलेल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये किंवा वस्तूंच्या अदलाबदलीद्वारे वसूल केले जात आहे. गोळा झालेली ही रक्कम इराणच्या राष्ट्रीय तिजोरीत जमा केली जात असल्याचे झंगेनेह यांनी सांगितले.
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. जागतिक तेल पुरवठ्याचा सुमारे २० टक्के भाग याच मार्गावरून जातो. इराणच्या मते, हा सागरी भाग त्यांच्या आणि ओमानच्या प्रादेशिक जलसीमेत येतो. त्यामुळे त्यांना वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा आणि सेवा शुल्क आकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार, कोणत्याही देशाला अशा आंतरराष्ट्रीय जलमार्गातील मुक्त वाहतूक रोखण्याचा किंवा त्यावर कर लावण्याचा अधिकार नाही. यामुळे इराण व पाश्चिमात्य देशांमध्ये नवा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत.
शांतता करार अयशस्वी झाल्यास इराणला उद्ध्वस्त करू : ट्रम्प
1. वॉशिंग्टन : इराणसोबत सुरू असलेली शांतता कराराची चर्चा अयशस्वी ठरल्यास आम्ही त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करू, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी दिली. मात्र, त्याच वेळी अमेरिका आणि इराण दरम्यान एका करारावर स्वाक्षरी होण्याच्या खूप ‘जवळ’ असल्याचा दावाही त्यांनी केला. ट्रम्प म्हणाले, मी हे एक तर चर्चेच्या माध्यमातून पूर्ण करेन, ज्यामध्ये आम्ही कराराच्या खूप जवळ आहोत किंवा मी त्यांना उद्ध्वस्त करेन.
2. १२.५ कोटींहून अधिक वसुली : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक व्यापारी जहाजाकडून इराण सरासरी १५ ते २० लाख डॉलर्स वसूल करत आहे.
3. नव्या पद्धतींचा वापर : आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराण हे शुल्क रोख रकमेऐवजी क्रिप्टोकरन्सी आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीद्वारे स्वीकारत आहे.
4. इराणचा दावा : हा सागरी मार्ग इराण आणि ओमानच्या हद्दीत येत असल्याने आपल्याला देखरेख व शुल्क आकारणीचा कायदेशीर हक्क असल्याचा इराणचा दावा.
5. जागतिक चिंतेत भर : २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होत असल्याने जागतिक बाजारात इंधनाचे दर आणि वाहतूक खर्च वाढण्याची भीती आहे.