

हाँगकाँग; वृत्तसंस्था : इराणमधील सुरू असलेल्या युद्धात तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बुधवारी जागतिक शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. अमेरिकन बाजाराने जवळपास वर्षातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवल्यानंतर आशियाई आणि युरोपीय बाजारातही सकारात्मक वातावरण निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती काही काळासाठी प्रतिबॅरेल 100 डॉलरच्या खाली घसरल्या.
युरोपियन बाजारात ब्रिटनचा एफटीएसई 100 निर्देशांक 1.8 टक्के वाढून 10,356.41 वर पोहोचला. फ्रान्सचा कॅक 40 हा 1.3 टक्के वाढला, तर जर्मनीचा डॅक्स निर्देशांक 1.6 टक्क्यांवर गेला. दक्षिण कोरियाचा कॉस्पी निर्देशांक तब्बल 8.4 टक्केने वाढला. जपानचा निक्की 225 निर्देशांक 5.2 टक्क्यांनी उंचावला. हाँगकाँगचा हँग सेंग 2.2 टक्क्यांनी वाढला. चीनचा शेघाई कॉम्पोझिट 1.5 टक्क्यावर गेला. भारताचा सेन्सेक्स 1.7 टक्क्याने वाढला. ब्रेंट क्रूड 102.98 डॉलरवर, तर अमेरिकन क्रूड 100.31 डॉलरवर घसरले.
मंगळवारी वॉल स्ट्रीटवर मोठी तेजी नोंदवली गेली. एस अँड पी 500 निर्देशांक 2.9 टक्क्यांनी वाढला. डो जोन्स 2.5 टक्क्यांवर गेला, तर नॅसडॅक 3.8 टक्क्यांनी उंचावला. सेमीकंडक्टर कंपनी मार्व्हल टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये 12.8 टक्क्यांनी वाढ झाली. कारण, एनव्हिडियाने त्यात 2 अब्ज डॉलर गुंतवणूक जाहीर केली. औषध क्षेत्रात सेंटेसा फर्मास्युटिकल्सचे शेअर्स 44 टक्क्यांनी वाढले.