

पुढारी ऑनलाईन डेस्क : भूतकाळात घडलेल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेतील मुख्य व्यक्ती शोधता येत नाही, हे एक वेळ मान्य करता येईल. किंवा इतिहासातील काही पात्रांबद्दल पुरावेच मिळत नाहीत, असेही होऊ शकते. पण आताच्या डिजिटल युगात एखाद्या व्यक्ती खरी ओळख शोधता येत नाही, असे सांगितले तर कोण विश्वास ठेवेल. त्यातही हा व्यक्ती तब्बल २ ट्रिलियन इतक्या मोठ्या इंडस्ट्रीची जनक आहे, आणि अजूनही त्याचा थांगपत्ता लागत नाही, असे सांगितले तुम्ही समोरच्या व्यक्तीला मूर्ख ठरवाल. पण हे अगदी खरे आहे. बिटकॉईनच्या निर्मितीचे श्रेय ज्या व्यक्तीला दिले जाते ती व्यक्ती म्हणजे सातोशी नाकामोटो. पण या व्यक्तीची खरी ओळख अजूनही समोर आलेली नाही.
गंमत म्हणजे अमका तमका म्हणजे सातोशी नाकामोटो अशा कॉन्सपिरसी थेअरी जगात पायलीला पन्नास आहेत, आणि आतापर्यंत 'मीच तो सातोशी नाकामोटो' असे दावे करणारे बरेच होऊन गेले आहेत, पण कोणालाही या दाव्यांवर आतापर्यंत तरी खरे उतरता आलेले नाही, असे बीबीसीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
गुरुवारी लंडनमधील विविध माध्यमांना पत्रकार परिषदेचे निमंत्रण देण्यात आले. एका पॉश हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद झाली. सातोशी नाकामोटो जगासमोर येणार, असा दावा करण्यात आला. पत्रकार परिषदेचे आयोजन अँडरसन नावाच्या एका व्यक्तीने केले होते. यात स्टिफन मोल्लाह याने स्वतः बिटकॉईन आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची निर्मिती केल्याचा दावा केला. पण या तोतया सातोशीला पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर देता आले नाही, आणि मीच सातोशी असा बनाव करणाऱ्यांच्या यादीत आणखी एकाची भर पडली.
२०१४मध्ये न्यूजवीक या नियतकालिकाने बरीच शोधाशोध करून कॅलिफोर्नियातील डिरोयिन नाकामोटो हा सातोशी नाकामोटो असल्याचे जाहीर करून टाकले. पण डोरोयिन यांनी हा दावा खोडून काढला, आणि हा दावा तोंडघशी पडला.
त्यानंतर ऑस्ट्रेलियातील संगणकतज्ज्ञ क्रेग राईट म्हणजेच सातोशी आहेत, अशी कॉन्सपिरसी थेअरी पसरली होती. राईट यांनी आधी हा दावा नाकारला आणि नंतर 'मीच सातोशी' असल्याचे सांगून टाकले. पण त्यांना अजून तरी कोणता पुरावा देता आलेला नाही. पुढे लंडनमधील एका न्यायालयाने राईट ही व्यक्ती सातोशी नाही असा निकाल दिला.
अजून एक गंमत म्हणजे अनेकांना वाटते की एलन मस्क हेच सातोशी आहेत. स्पेस एक्समधील एका कर्मचाऱ्यानेच असा दावा केला होता. पण मस्क यांनी स्वतःच यात काही तथ्य नसल्याचा खुलासा केला आहे.
पण सातोशी नाकामोट ही व्यक्ती रहस्य असलेलीच बरी असे अनेकांना वाटते. "सातोशी नाकामोटो कोण आहे, हे कोणालाही माहिती नाही आणि ही चांगली गोष्ट आहे," असे अॅडम ब्लॅक यांनी म्हटले आहे. ब्लॅक बिटकॉईनचे कोअर डेव्हलपर पैकी एक आहेत, आणि गंमतीचा भाग म्हणजे अनेकांना अॅडम हाच सातोशी आहे, असे वाटते.
नातालिया ब्रुनेल या बिटकाईनवर पॉडकास्ट बनवतात. त्यांचे मत आहे की सातोशी नाकमोटो याची खरी ओळख माहिती नसणे ही चांगलीच गोष्ट आहे. "त्यामुळेच लोक बिटकॉईन या सिस्टमवर विश्वास ठेवतात. तसे नसते तर लोक सातोशी या व्यक्तीवर विश्वास ठेऊन असते."