नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
बुद्धीकौशल्याच्या जोरावर तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन जग जिंकता येत, हे दाखवून देणाऱ्या स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. ५० वर्षाहून अधिककाळ आजाराने ग्रासल्यानंतरही त्यांनी आपल्यातील बुद्धीमत्तेच्या जोरावर जगावर छाप सोडली. जाणून घेवूयात त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी…
वाचा: जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन
वाचा: अफाट इच्छाशक्तीचे दुसरे नाव स्टीफन हॉकिंग!
> बालपणी स्टीफीन हॉकींग यांना विज्ञान आणि गणित विषयात अधिक रुची होती. त्यांना शाळेत आइनस्टाइन म्हणून संबोधले जायचे. यातूनच त्यांच्या अफाट बुद्धीमतेची क्षमता दिसून येते.
> स्टीफन हॉकींग ऑक्सफर्ड युनिव्हसिटीमध्ये गणित विषयात शिक्षण घेण्यास इच्छूक होते. पण याठिकाणी गणितीची पदवी मिळत नसल्याने त्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयाची निवड केली.
> ऑक्सफर्डमधील पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पीएचडीसाठी केब्रीज युनिव्हसिटीत प्रवेश घेतला.
> वयाच्या २१ व्या वर्षात असाध्य अशा आजारामुळे स्टीफन यांच्यावर एक मोठे संकट कोसळले. याच काळात जेन वाईल्ड हिच्यासोबतच्या त्यांचे प्रेम विवाहात रुपांतरीत झाले.
> १९९५ मध्ये जेन वाईल्डने त्यांना घटस्फोट दिला. त्यानंतर त्यांनी इलियाना मेसन यांच्याशी विवाह केला. आपल्या दुसऱ्या पत्नीला त्यांनी २००६ मध्ये घटस्फोट दिला. दोन्ही पत्नींकडून त्यांना तीन मुले आहेत.
> २००७ साली स्टीफन यांनी शून्य गुरूत्त्वाकर्षण शक्तीचा अनुभव घेतला. त्यावेळी कित्येक वर्षींनी प्रथमच ते आपल्या व्हिलचेअरवरून उठले होते.
> शरीर साथ देत नसताना देखील त्यांनी तब्बल १२ पदव्या मिळवल्या होत्या.
> स्टीफन यांनी रिसर्चमधील सर्वाधिक वेळ हा विश्वाची निर्मिती कशी झाली, आकाशातील कृष्णविवरे (ब्लॅक होलेज) कशी तयार होतात या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न केला.
> कृष्णविवरातून किरणे बाहेर पडत असल्याचा शोध त्यांनी लावला. यापूर्वी कृष्णविवराच्या शक्तिशाली गुरुत्वाकर्षणामुळे त्यातुन कोणतीही गोष्ट मिळत नाही, असे मानले जात होते. स्टीफन यांनी रेडियशनचा शोध लावल्यामुळे आज ब्लॅकविवराच्या रेडियशनला हॉकींग रेडियशन या नावाने देखील ओळखले जाते.
> १९९८ मध्ये त्यांनी 'ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाइम' या शिर्षकाखाली एक पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाची चांगलीच चर्चा झाली. विश्वाची निर्मितीचा सिद्धांत सरळ आणि सोप्या भाषेत सांगितला होता. या पुस्तकातून त्यांनी देवाचे अस्तित्व नाकारल्यामुळे वादही झाला होता.
> आधुनिक विज्ञानाचे जनक गॅलिलिओ यांच्या निधनानंतर ३०० वर्षानंतर हॉकींग यांचा जन्म झाला. गॅलिलिओ यांचे ८ जानेवारी १६४२ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर ८ जानेवारी १९४२ मध्ये स्टीफन हॉकींग यांचा जन्म झाला. विश्वातील एका महान शास्त्रज्ञाच्या स्मृतीदिन हा त्यांचा जन्मदिवस ठरला.