याला म्‍हणतात थाट..! ऑफीस १६०० किमी अंतरावर, तरी दररोज घरी जाणारच!

'स्टारबक्स'चे नवीन सीईओ विमानाने गाठणार ऑफीस
starbucks new CEO Brian Niccol
स्टारबक्स कंपनीचे नवीन सीईओ ब्रायन निकोल घरापासून ऑफिसपर्यंत दररोज 1600 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यासाठी ते कॉर्पोरेट जेटचा वापर करतील.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपण नोकरी करत असलेल्‍या ऑफीस जवळ असावे, अशी इच्‍छा प्रत्‍येक कर्मचार्‍याची असतेच. कारण जेवढे तुमचं ऑफीस लांब तेवढा प्रवासाचा त्रास हे तर ठरलेलच. त्‍यामुळेच मूळ घरापासून काही तासांच्‍या अंतरावर असणार्‍या शहरात नोकरी मिळाली तर नोकरीच्‍या ठिकाणी राहणे हे अधिक सोयीस्‍कर पडतं;पण कोणी तब्‍बल १६०० किलोमीटर अंतर पार करुन ऑफीस जातं, असे तुम्‍हाला सांगितले तर तुमचा नक्‍कीच आश्‍चर्य वाटेल; पण ही आश्‍चर्यकारक कामगिरी कॉफीसाठी प्रसिद्ध स्टारबक्स ( starbucks) कंपनीचे नवीन सीईओ ब्रायन निकोल ( Brian Nicco) करणार आहेत. ब्रायन आपल्या घरापासून ऑफिसपर्यंत दररोज 1600 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यासाठी ते कॉर्पोरेट जेटचा वापर करतील. अर्थात प्रवासाचा खर्च कंपनी देणार आहे. l

पुढील महिन्यात स्वीकारणार 'सीईओ'पदाचा कार्यभार

सीईओ पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ब्रायन यांनी अद्याप कार्यालयात रुजू झालेले नाही. पुढील महिन्यापासून ते जबाबदारी स्वीकारणार आहेत. ब्रायन निकोल यांचे घर कॅलिफोर्नियातील न्‍यूपोर्ट येथे आहे. तर स्‍टारबक्‍सचे मुख्‍यालय हे वॉशिंग्‍टनमधील सिएटल येथे आहे. या दोन शहरांमधील हवाई अंतर सुमारे १६०० किलोमीटर आहे. ब्रायन निकोल यांनी कॅलिफोनिर्यातच राहण्‍याचा निर्णय घेतला आहे. ते दररोज विमानाने वॉशिंग्‍टनमधील सिएटल कंपनीच्‍या कार्यालयात जातील. कंपनीच्‍या धोरणानुसार ब्रायन यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात यावे लागणार आहे.

कोण आहेत ब्रायन निकोल? पगार  9,48,61,57,900 रुपये!

ब्रायन निकोल हे 2018 पासून चिपोटलचे सीईओ होते. चिपोटल कंपनीच्‍या यशात त्‍यांचे मोठे योगदान राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा महसूल जवळपास दुप्पट झाला होता. आता ते स्टारबक्स कंपनीचे नेतृत्त्‍व कसे करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.स्टारबक्स कंपनीचे सीईओ ब्रयान यांना दरवर्षी कोट्यवधी रुपये पगार मिळणार आहे. कंपनीकडून त्‍यांना सुमारे $113 दशलक्ष ( 9,48,61,57,900 रुपये) पगार दिला जाईल. ब्रायन निकोलचा वार्षिक मूळ पगार 13.42 कोटी रुपये आहे. त्यांच्या कामावर अवलंबून, त्यांना दरवर्षी $3.6 दशलक्ष ते $7.2 दशलक्ष बोनस देखील मिळेल. ताे मूळ वेतनापेक्षा चारपट जास्त आहे. त्याचबराेबर कंपनीच्या समभागांमध्ये मिळणारे वार्षिक भागभांडवल 23 दशलक्ष डॉलरपर्यंत असू शकते.

ब्रायन यांच्‍या आधी स्टारबक्स कंपनीचे सीईओ भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन होते. कंपनीने नरसिंहन यांना हटवले होते. नरसिंहन यांनी मार्च २०२३मध्ये स्टारबक्सचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला होता. नरसिंहन यांनी एका मुलाखतीत स्‍पष्‍ट केले होते की, सायंकाळी ६ नंतर कधीही काम केले नाही. त्‍यांचे हे विधान जगभरातील कार्पोरेट क्षेत्रात चर्चेचा विषय ठरले होते.

स्टारबक्स जगातील सर्वात मोठी कॉफी हाऊस कंपनी

१९७१ मध्‍ये जॅरी बाल्डविन, जेव सिगल व गॉर्डन बॉकर या सॅन फ्रान्सिस्को युनिव्हर्सिटीच्‍या तीन विद्यार्थींनी स्‍टारबक्‍स कॅफेला सुरुवात केली. हाेती १९८१ मध्‍ये एक कंपनीत सेल्‍समन म्‍हणून काम करणारे होवार्ड शुल्‍ट्‍झ कॅफेत दाखल झाले. त्‍यांनी सारे चित्रच पालटले. त्‍यांनी मिलानच्‍या धर्तीवर अमेरिकेतही कॉफी बार सुरु करण्‍याचा मानस व्‍यक्‍त केला. मात्र याला कंपनीचे मालक मात्र राजी नव्हते. अखेर अनेक प्रयत्‍नातून त्‍यांनी सिएटलच्या कॉफी बार सुरू करण्याची परवानगी मिळाली. अल्‍पावधीत या कॉफीबारला मोठी प्रसिद्धी मिळाली. संपूर्ण सिएटलमध्ये कॉफी हाऊस कल्चर विस्‍तारले. होवार्ड शुल्‍ट्‍झयांनी १९८५मध्ये ‘स्टारबक्स’ सोडले आणि वेगळी कॉफी बार चेन कंपनी सुरू केली. त्‍यांनीच पुढे १९८७मध्ये स्‍टारबक्‍स कंपनी खरेदी केली. यानंतर त्‍यांनी जगभरातील ६३पेक्षा अधिक देशांमध्ये ‘स्टारबक्स’चा विस्‍तार केला. आज जगातील सर्वात माेठी कॉफी हाऊस कंपनी कंपनी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news