

पुढारी ऑनलाईन डेस्क : नायजेरियाच्या राजधानीत ख्रिसमसच्या कार्यक्रमात स्थानिक चर्चद्वारे खाद्यपदार्थ वाटपावेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ३२ झाली आहे. मृतांमध्ये चार मुलांचा समावेश आहे, असे वृत्त 'एपी'ने दिले आहे. शनिवारी अबुजा शहरातील मैतामा येथील होली ट्रिनिटी कॅथोलिक चर्चमध्ये पहाटे ही दुर्घटना घडली होती.
ख्रिसमस निमित्त होली ट्रिनिटी कॅथोलिक चर्चमध्ये पहाटे खाद्यपदार्थ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चर्चमध्ये प्रवेश करण्यासाठी एकच गर्दी उसळली. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत जागीच १३ जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमींवर उपचार सुरु होते. आज मृतांचीसंख्या ३२ झाली आहे. मृतांमध्ये दक्षिणपूर्व अनाब्रा राज्यातील ओकिजा शहरातील 22 लोकांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी नायजेरियातील नैऋत्य ओयो राज्यात मुलांना भेटवस्तूंचे वाटपाच्या कार्यक्रमावेळीही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. अशा कार्यक्रमांच्या सुरक्षेच्या उपायांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.