

अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डी.सी. : राजधानीत डाऊनटाऊन विभागात व्हाईट हाऊसजवळ बुधवारी दुपारी म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 11.30 च्या सुमारास नॅशनल गार्ड (लष्कर) च्या दोघा सैनिकांवर गोळीबार करण्यात आला. या घटनेने सारी अमेरिका हादरली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचे म्हटले असून, हल्लेखोराला त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हल्लेखोर गंभीर जखमी झाला असून, घटनेदरम्यान त्यालाही गोळी लागल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. सैनिकांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे सांगण्यात येते. होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) हा संशयित रहमानुल्ला लाकनवाल, अफगाणी नागरिक असल्याचे म्हटले आहे. या गोळीबारामागील हेतू अद्याप समजला नाही, असे अधिकार्यांनी सांगितले. या खात्याच्या माहितीनुसार, लाकनवाल 2021 मध्ये ‘ऑपरेशन अलाईज वेलकम’अंतर्गत अमेरिकेत दाखल झाला. हा बायडेन यांच्या अध्यक्षीय काळातील कार्यक्रम अफगाण युद्धादरम्यान अमेरिकेला मदत करणार्या आणि तालिबानकडून सूड घेण्याची भीती असलेल्या हजारो अफगाणींचे पुनर्वसन करण्यासाठी होता. तालिबानने अमेरिकेच्या माघारीनंतर त्यांच्या देशावर नियंत्रण मिळवले होते.
‘डीएचएस’ने त्याच्या स्थलांतर नोंदींबाबत इतर तपशील दिले नाहीत. मात्र, नाव न सांगण्याच्या अटीवर ट्रम्प प्रशासनातील एका अधिकार्याने सांगितले की, लाकनवालने डिसेंबर 2024 मध्ये आश्रयासाठी अर्ज केला होता. यावर्षी 23 एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी आल्यानंतर तीन महिन्यांनी तो मंजूर झाला होता. लाकनवाल (वय 29) वॉशिंग्टन राज्यात राहत होता. त्याच्याबाबत कोणताही ज्ञात गुन्हेगारी इतिहास आढळला नव्हता, असेही अधिकार्यांनी सांगितले. बुधवारी मध्यरात्रीनंतर यू. एस. सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने अफगाण नागरिकांशी संबंधित सर्व इमिग्रेशन विनंत्यांच्या प्रक्रियेला तत्काळ आणि अनिश्चित काळासाठी स्थगिती जाहीर केली. सुरक्षा आणि तपासणी प्रोटोकॉलचा आढावा घेतला जात नाही, तोपर्यंत ही स्थगिती कायम राहील.
या गोळीबारातील दोन सैनिक वेस्ट व्हर्जिनिया नॅशनल गार्डचे सदस्य आहेत. दुपारी सुमारे 2.15 वाजता व्हाईट हाऊसपासून काही ब्लॉक अंतरावर 17 व्या आणि आय स्ट्रीटच्या कोपर्यावर हाय-व्हिजिबिलिटी पॅट्रोलच्या मोहिमेत ते सहभागी झाले होते. संशयित कोपर्यातून आला आणि त्यांच्यावर हल्ला केला, असे मेट्रोपॉलिटन पोलिसांचे सहायक प्रमुख जेफ कॅरोल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गोळीबाराच्या चकमकीनंतर इतर नॅशनल गार्ड सैनिकांनी गोळीबार करणार्याला निष्प्रभ केले. जखमी सैनिकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे, असे ‘एफबीआय’चे संचालक काश पटेल यांनी सांगितले. हा गोळीबार नियोजित होता, असे वॉशिंग्टनच्या महापौर म्युरियल बोऊझर यांचेही म्हणणे आहे. अधिकार्यांच्या मते, गोळीबार करणारा एकटाच होता.
राजधानीत आणखी 500 गार्ड तैनात
या घटनेनंतर ट्रम्प यांनी आणखी 500 गार्ड वॉशिंग्टनमध्ये तैनात करण्याचे आदेश दिले आहेत, असे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी पत्रकारांना सांगितले.
हे दहशतवादी कृत्य : ट्रम्प
हल्ल्याच्या वेळी ट्रम्प फ्लोरिडामधील आपल्या रिसॉर्टवर होते. त्यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर व्हिडीओ निवेदन प्रसिद्ध केले. हल्लेखोराचा उल्लेख ‘पशू’ असा करीत हा गोळीबार द्वेष आणि दहशतवादी कृत्य आहे. हल्लेखोराला त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांनी याप्रकरणी जो बायडेन यांना दोष दिला आहे, बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात लाखो गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जगभरातील स्थलांतरित अमेरिकेत आले, असा दावा करून अमेरिकेत आलेल्या सर्व अफगाणी नागरिकांचे आपले प्रशासन पुनर्परीक्षण करेल, असेेही त्यांनी जाहीर केले.
देशभरात शोध वॉरंटस्
‘एफबीआय’ संचालक काश पटेल यांनी सांगितले की, त्यांचे कार्यालय अमेरिकेच्या अॅटर्नी कार्यालयाच्या सहकार्याने देशभरात शोध वॉरंटस्ची अंमलबजावणी करत आहे. यामध्ये संशयिताचे वॉशिंग्टन राज्यातील शेवटचे ज्ञात निवासस्थानही समाविष्ट आहे.