

न्यूयॉर्क / सॅन फ्रान्सिस्को; वृत्तसंस्था : टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) चे सीईओ इलॉन मस्क यांनी त्यांच्या मुलाच्या नावामागील भारतीय प्रेरणा उलगडली आहे. मस्क यांच्या एका खासगी, पण अर्थपूर्ण पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. एक्सवरील टेस्ला ओनर्स सिलिकॉन व्हॅली या या हँडलने मस्क यांच्यासोबत त्यांच्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर केला होता. या फोटोवर मस्क यांनी केलेली कमेंट जगभर व्हायरल झाली. या पोस्टमध्ये मस्कने प्रथमच आपल्या जुळ्या मुलांची पूर्ण नावे आणि त्यामागील प्रेरणा स्पष्ट केली. मस्क यांच्या जुळ्या मुलांपैकी मुलाचे नाव आहे स्ट्रायडर सेखर आणि मुलीचे नाव आहे कॉमेट अझूर.
‘मी माझा मुलगा स्ट्रायडर सेखर (एरागॉर्न ऊर्फ स्ट्रायडर आणि महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर यांच्या नावावरून) आणि मुलगी कॉमेट अझूर (एल्डन रिंग या व्हिडीओ गेममधील सर्वात शक्तिशाली जादूवरून) यांच्यासोबत आहे,’ असे मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ही जुळी मुले नोव्हेंबर 2021 मध्ये मस्क आणि न्यूरालिंक कंपनीतील वरिष्ठ अधिकारी शिवॉन झिलीस यांची मुले असून ती आयव्हीएफ पद्धतीने जन्माला आली होती. आतापर्यंत ही मुले केवळ स्ट्रायडर आणि अझूर या नावांनी ओळखली जात होती. मात्र आता त्यांच्या नावामागील अर्थ उघड झाल्याने सोशल मीडियावर मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मस्कच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी भारतीय शास्त्रज्ञाला दिलेल्या सन्मानाचे कौतुक केले. काहींनी टॉल्किन आणि चंद्रशेखर यांचा संगम ‘जागतिक संस्कृतीचे प्रतीक’ असल्याचे म्हटले तर काहींनी नेहमीप्रमाणे मस्कच्या नावांच्या विचित्रपणावर विनोदही केले.
मस्क यांच्या मुलाच्या नावातील ‘सेखर’ हा भाग विशेष चर्चेत आहे. हे नाव प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन खगोल-भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांना समर्पित आहे. चंद्रशेखर हे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ होते. तार्यांची निर्मिती, रचना आणि आयुष्य यावर त्यांनी केलेले संशोधन विज्ञानाच्या इतिहासात मैलाचा दगड मानले जाते. तर ‘स्ट्रायडर’ हे नाव प्रसिद्ध ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ कादंबरीतील नायक अरागॉर्न (स्ट्रायडर) यावरून घेतले आहे. अशा प्रकारे मस्कने काल्पनिक साहित्य आणि वास्तवातील विज्ञान यांचा अनोखा संगम आपल्या मुलाच्या नावात केला आहे.
मस्क आपल्या मुलांना हटके आणि अर्थपूर्ण नावे देण्यासाठीही ओळखले जातात. त्याच्या इतर मुलांची नावेही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहेत, उदा. X A-Xii, एक्सा डार्क सीडेराएल, टेक्नो मेकानिकस, सेल्डन लिकर्गस. ही नावे विज्ञानकथा, प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित आहेत. सेल्डन लिकर्गस हे नाव आयझॅक अॅसिमोव्हच्या फाऊंडेशन मालिकेतील पात्र आणि प्राचीन स्पार्टन योद्धा लायकर्गस यांच्यावरून घेतलेले आहे.