

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने तेलपुरवठा विस्कळीत होण्याची भीती होती. मात्र, सौदी अरेबियाने गेल्या सप्ताहात तब्बल १० कोटी बॅरल तेल आशियाई देशांसाठी खुले केले. त्यामुळे भारत, चीन, जपान, दक्षिण कोरियासह विविध देशांना या तेलाचा फायदा झाला.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हे तेल आशियाई देशांना मिळणार आहे. सौदी अरेबियाच्या विक्रीतील ही वाढ जागतिक मागणीच्या साधारणत: एका दिवसाच्या इतकी आहे. यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून सौदी अरेबियाकडून आशियाकडे होणारा सध्याचा तेलपुरवठा दुपटीहून अधिक वाढू शकतो. सौदी अरेबियाची पूर्व-पश्चिम पाईपलाईन होर्मुझ सामुद्रधुनीला वळसा घालून लाल समुद्रापर्यंत तेल पोहोचवते. ही वाहिनी १० सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर अजूनही पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही. सौदी अरामको ही वाहिनी पुन्हा सुरू करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असून लवकरच ती बऱ्यापैकी पूर्ववत होईल.
आशियाई देशांकडून स्वागत
आशियामध्ये या तेलाचे स्वागत केले जाईल; कारण तेलाचे वाढते दर पाहता चीन आणि भारतातील रिफायनरीज उत्पादन क्षमता कमी करण्याचा विचार करत आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणकडून होणारा पुरवठा थांबला आहे तर वाढत्या राजकीय धोक्यांमुळे खरेदीदार रशियन कच्च्या तेलाकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे विविध प्रकारच्या तेलासाठीची स्पर्धा तीव्र झाली आहे.