

अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डी. सी. : व्हाईट हाऊसजवळ झालेल्या घातपातात गोळीबार झालेल्या नॅशनल गार्डच्या जवानांपैकी महिला सैनिक स्पेशालिस्ट सारा बेकस्ट्रॉम यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दिली. यानंतर काही तासांतच त्यांनी समाजमाध्यमांवर स्थलांतरविरोधी तीव्र टीका करणारी पोस्ट प्रसिद्ध केली.
बुधवारी झालेल्या गोळीबाराचा त्यांच्या पोस्टमध्ये थेट उल्लेख नव्हता; मात्र हा प्रकार घडल्यानंतर ट्रम्प प्रशासनाकडून स्थलांतर आणि निर्वासितांबाबत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली जात आहे. वेस्ट व्हर्जिनियातील 20 वर्षीय आर्मी स्पेशालिस्ट सारा बेकस्ट्रॉम या प्रत्येक बाबतीत उत्कृष्ट असल्याचे ट्रम्प यांनी एका व्हिडीओ कॉलदरम्यान सांगितले. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्हाईट हाऊसने सांगितले की, ट्रम्प यांनी त्या संध्याकाळी बेकस्ट्रॉम यांच्या पालकांशी संवाद साधला. या हल्ल्यात बेकस्ट्रॉम आणि एअर फोर्स स्टाफ सार्जंट अँड्र्यू वुल्फ (वय 24) गंभीर जखमी झाले होते. अधिकार्यांच्या मते, हा हल्ला लक्ष्यित होता. संशयितालाही जखमी अवस्थेत अटक करण्यात आली असून, तो सध्या कोठडीत आहे. अँड्र्यू वुल्फ अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. संशयित राहमानुल्ला लाकनवाल (वय 29) हा सप्टेंबर 2021 मध्ये अमेरिकेत दाखल झाला होता. अमेरिकन सैन्याच्या अफगाणिस्तानातून माघारीनंतर सुरू केलेल्या पुनर्वसन योजनेंतर्गत त्याला प्रवेश देण्यात आला होता. त्याच्यावर अनेक फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
स्थलांतरितांचे नागरिकत्व रद्द करणे अजेंडा
रात्री समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी स्थलांतरितांवर जोरदार टीका करत डेमोक्रॅटिक नेत्यांनाही लक्ष्य केले. त्यांनी सर्व तिसर्या जगातील देशांमधून कायमस्वरूपी स्थलांतर थांबवू, अशी घोषणा केली, तसेच बिगर नागरिकांना दिले जाणारे सर्व फेडरल लाभ बंद करणे आणि देशांतर्गत शांतता बिघडवणार्या स्थलांतरितांचे नागरिकत्व रद्द करणे, असा अजेंडा असल्याची धमकी दिली.