

अनिल टाकळकर
वॉशिंग्टन डी.सी. : शेन्झेन शिखर परिषदेत ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या समवेत स्थान मिळवून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जागतिक महासत्ता म्हणून रशियाचे स्थान पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात प्रतीकात्मक यश मिळवले. युक्रेन युद्धाबाबत कोणतीही तडजोड न करता पाश्चिमात्य देशांचे एकाकी पाडण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे त्यांनी दाखवून दिले.
चीनमधील शेन्झेन येथे गुरुवारी झालेल्या अमेरिका, चीन आणि रशिया या तीन देशांच्या प्रमुखांच्या पहिल्याच त्रिपक्षीय शिखर बैठकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मोठा राजनैतिक विजय मिळवला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या खांद्याला खांदा लावून पुतीन उभे राहिले. ट्रम्प यांनी त्यांचा उल्लेख ‘माझा मित्र’ असा केला. गेल्या काही वर्षांपासून रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पाडण्याचे पाश्चिमात्य देशांचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे पुतीन यांनी जाहीर केले.
२०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले. मात्र, या शिखर परिषदेमुळे जागतिक राजकारणात रशियाला पुन्हा महत्त्वाचे स्थान मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटच्या रशिया विषयातील तज्ज्ञ अँजेला स्टेंट यांच्या मते, या बैठकीने पाश्चिमात्य देशांनी पुतीन यांच्यावर लादलेल्या राजनैतिक एकाकीपणाला मोठा धक्का दिला आहे.
वास्तविक पाहता अर्थव्यवस्था, लोकसंख्या आणि जागतिक आर्थिक प्रभाव या निकषांवर रशिया अमेरिका आणि चीनच्या तुलनेत मागे आहे. मात्र, अण्वस्त्रांच्या बाबतीत रशियाचे सामर्थ्य अजूनही जगात सर्वाधिक आहे. सोव्हिएत संघाकडून वारशाने मिळालेल्या या अण्वस्त्रसामर्थ्याची जाणीव पुतीन यांनी या परिषदेत करून दिली. परिषदेला येण्यापूर्वी रशियाची अण्वस्त्रवाहू बॉम्बफेकी विमाने व्हिएतनाममध्ये उतरली. शीतयुद्धाच्या काळानंतर प्रथमच अशी घटना घडली.
पुतीन यांचे उद्दिष्ट
सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर रशियाचे कमी झालेले जागतिक सामर्थ्य पुन्हा प्रस्थापित करणे हे पुतीन यांच्या राजवटीचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे. अमेरिकेच्या वर्चस्वाखालील एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेला त्यांचा सातत्याने विरोध राहिला आहे. शेन्झेन परिषदेत मिळालेल्या प्रतिष्ठेमुळे त्यांची ही महत्त्वाकांक्षा काही प्रमाणात पूर्ण झाल्याचे चित्र आहे.